एका अनुरागच्या चित्रपटामुळे सपाटून मार खाल्लेल्या रणबीर कपूरला दुसऱ्या अनुरागकडून यशस्वी चित्रपटाची गरज आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ सपशेल आपटल्यानंतर रणबीरने आपले सगळे लक्ष त्याचे पहिले होम प्रॉडक्शन असलेल्या ‘जग्गा जासूस’कडे केंद्रित केले आहे. मात्र, सध्या तरी या चित्रपटाच्या आणि रणबीरच्या अडचणी संपायचे नाव घेत नाही आहेत. या चित्रपटाची आणि प्रत्यक्षातही रणबीरची नायिका कतरिना कैफ आणि दिग्दर्शक अनुराग बासू यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. हे वाद मिटायची चिन्हे नसल्याने आधीच अडचणीत असलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट पुन्हा रखडला आहे.
‘जग्गा जासूस’ ही रणबीर आणि अनुराग बासू यांची संयुक्त निर्मिती आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनीती’ या चित्रपटानंतर कतरिना आणि रणबीर या चित्रपटात पुन्हा एकत्र येणार आहेत, हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. रणबीर आणि अनुरागचे मैत्रीचे सूर जुळले असल्याने त्यांना एकत्र काम करण्यात अडचण नाही. मात्र, अनुराग अजूनही कतरिनाशी जुळवून घेऊ शकलेला नाही किंवा दिग्दर्शक म्हणून अनुरागला आपल्याकडून काय हवे आहे? याची कल्पनाच कतरिनाला येत नसल्याने दोघांमध्येही वादाची ठिणगी पडली आहे. या दोघांचाही जवळचा माणूस म्हणून रणबीरने त्यांच्यातला दुरावा नाहीसा करणे अपेक्षित होते. मात्र, त्या दोघांच्याही भांडणात गोंधळलेल्या रणबीरने कोणतेच प्रयत्न केले नसल्याने हा वाद वाढतच चालला आहे.
‘जग्गा जासूस’ या चित्रपटाची बरीचशी दृश्ये पुन्हा चित्रित केली जात आहेत त्यामुळे आधीच चित्रपट रखडला आहे. आता कतरिना आणि अनुरागच्या भांडणामुळे चित्रीकरणातही अडथळे येत आहेत. पण, या सगळ्याला अनुराग बासू जबाबदार असल्याचे सेटवरील सूत्रांचे म्हणणे आहे. मध्यंतरी, चित्रिकरणादरम्यान कतरिनाची चूक झाल्यानंतर अनुराग सगळ्या युनिटसमोर तिच्या अंगावर खेकसला. कतरिना कधीही सेटवर कुठले नखरे करत नाही किंवा दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळही करत नाहीत. तिच्या स्वभावाला अनुसरूनच सर्वासमोर ओरडा खाऊनही तिने दिग्दर्शकाला कुठलेही प्रत्युत्तर दिले नाही. ती शांतपणे सेट सोडून निघून गेली. हा सगळा प्रकारही रणबीरसमोर घडला. पण, तरीही त्याने दोघांच्या मध्ये न पडणे पसंत केले. रणबीरच्या या पवित्र्यामुळे अनुराग आणि कतरिनामधले भांडण वाढतच चालले असून ‘जग्गा जासूस’च्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा