गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाआधी काही महिने ते डेटदेखील करत होते. त्यांच्या लग्नाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. लग्नानंतर कतरिनाने थोडा वेळ ब्रेक घेण्याचे ठरवले. जुलै महिन्यामध्ये तिचे एका चित्रपटाच्या सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. कतरिनाचे ‘टायगर ३’, ‘फोन भूत’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ हे तीन चित्रपट काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कॉफी विथ करण शोमध्येही तिने हजेरी लावली होती.
कतरिना सध्या ‘मेरी ख्रिसमस’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. सिनेदिग्दर्शक श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटामध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती आणि कतरिना प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाच्या रिहर्सलदरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या पोस्टखाली तिने “काम सुरु झाले आहे”, असे कॅप्शन दिले होते. तसेच या पोस्टला कतरिनाने रिहर्सल, मेरी ख्रिसमस आणि श्रीराम राघवन असे हॅशटॅग्स देखील जोडले होते.
कतरिना कैफ सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिचे लाखो चाहते तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तिने रविवारी ‘मेरी ख्रिसमस’च्या सेटवरचे ३ फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यातला पहिला फोटो चित्रपटाच्या क्लॅपबोर्डचा आहे. त्यावर चित्रपटाचे नाव, चित्रीकरणाच्या दृश्याची माहिती, टेकचा आकडा, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेचे नाव अशी माहिती लिहिलेली आहे. दुसरा फोटो दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा आहे. फोटोवरुन ते कॅमेरामागे बसून सीन पाहत आहेत असे कळते. तिसऱ्या फोटोमध्ये विजय सेतुपती पोज देऊन उभा आहे. या फोटोवर कतरिनाने ‘हा फोटो मी काढला आहे’ असे लिहिले आहे. हे तिन्ही फोटो मोनोक्रोम म्हणजेच ब्लॅक अॅन्ड व्हाईट मोडमध्ये काढलेले आहेत.
फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रा हे त्रिकुट पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसणार आहे.