सलमान-कतरिनाचा ‘भारत’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ५ जून म्हणजेच ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ तीन दिवसात १०० कोटींकडे यशस्वी घोडदौड केली आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणार आहे यात काही शंकाच नाही. आतापर्यंत सलमान कतरिनाच्या जोडीची जादू बऱ्याच चित्रपटांमधून अनुभवायला मिळाली आहे. ऑफ स्क्रीन सुद्धा त्यांची मैत्री तेवढीच खास आहे. ‘भारत’मधील कतरिनाच्या भूमिकेचं अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय.

नुकताच कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘भारत’मधील तिच्या भूमिकेबद्दल तिने सांगितले आहे. ही व्यक्तिरेखा कतरिनाने कशी साकारली हे या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक अली अब्बास जफर व कतरिनाने सांगितले आहे. ही भूमिका तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे कतरिनाने ता व्हिडीओमध्ये सांगितले आहे. व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिले आहे की, ‘कुमुद रैना कायमच माझ्यासाठी खास असेल. हा अनुभव मी खूप मिस करणार आहे. ही भूमिका करतानाच प्रत्येक क्षण मला आवडला आहे. हा चित्रपट बनवण्यासारगी प्रत्येकानेच जीव ओतून मेहनत केली आहे. सेटवरील प्रत्येक दिवस खूप खास होता.’

या चित्रपटात दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे.‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे.