कतरिना कैफ सहजपणे हार मानणाऱ्यातील नाही. ‘धूम ३’मध्ये तिची ४४ व्या मिनिटाला पडद्यावर एन्ट्री होते (१७२ मिनिटांपैकी तेवढा भाग तिच्याशिवाय गेला) व नंतरही तीन नृत्यात दमदार अदाकारी करूनही जेमतेम काही फुटांचे काम तिच्या वाटेला आले. (कारण आमिर खान १५० मिनिटे व्यापलाय) तात्पर्य, इतनी बडी पिक्चरमें कतरिनाच्या वाटेला फारसे काही आले नसले तरी तेवढय़ाही भागात ती मोहकता व मादकता या गुणाने छा गयी.. सलमान खान-अक्षय कुमार यांच्यात ती फारशी अडकून पडली नाही, रणबीर कपूरशीही साथसंगत कायम ठेवेल याची तरी खात्री नाही. २०१४ कतरिनासाठी जरा जादाच महत्त्वाचे आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘फन्टोम’, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘बँग बँग’, अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ व अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’.. कतरिनाला आपला ठसा उमटवण्यासाठी हे पुरेसे आहे. भले तिला २०१४ मध्येही अभिनयाचे गणित फारसे जमणार नाही, पण नृत्याची चपळता तिला गवसेल ना? नृत्याच्या माध्यमातून अभिनय अधिक महत्त्वाचा व प्रभावी असतो, त्या नृत्यासाठी केवढी तरी मेहनतही लागतेच. कतरिनाने त्यासाठी तयारीही ठेवली आहे म्हटलं.

Story img Loader