लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयातील बॉलिवूड विभाग जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. या विभागात कोणत्या बॉलिवूड कलाकाराची वर्णी लागणार याबद्दल लोकांना उत्सुकता असतेच पण, कलाकारही त्या संधीची वाट पहात असतात. त्यामुळे यावर्षी कतरिना कैफचा मेणाचा पुतळा या संग्रहालयात स्थापन होणार हे ऐकल्यानंतर एखाद्या शाळकरी मुलीसारखा तिचा उत्साह ओसंडून जात होता. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संग्रहालयाने दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ अशी तीन नावे सुचवली होती. ज्यात कतरिनाला सर्वात जास्त मते मिळाल्याने आता तिचा मेणाचा पुतळा संग्रहालयात स्थानापन्न होणार आहे.
कतरिनाचा पुतळा बनवण्यासाठी मादाम तुसाँ संग्रहालयाची वीसजणांची टीम मुंबईत आली आहे. पुतळ्यासाठी मोजमाप घेणे, तिची पोज ठरवणे अशा तांत्रिक गोष्टी टिपून घेण्यासाठी ही टीम कतरिनाबरोबर काम करते आहे. मादाम तुसाँ संग्रहालयाने माझा मेणाचा पुतळा तिथे बसवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. पण, खरा आनंद हा आहे की या निर्णयात माझ्या चाहत्यांचा सहभाग आहे. यासारखी दुसरी चांगली गोष्ट जगात असू शकत नाही, असे कतरिनाने म्हटले आहे. संग्रहालयात कोणाचा पुतळा बसवावा यासाठी ऑनलाइन मते मागवली जातात. यावेळी दीपिका, प्रियांका आणि कतरिना तिघींची नावे स्पर्धेत होती. मात्र, लोकांची पसंती कतरिनाच्या नावालाच जास्त मिळाल्याने तिची निवड करण्यात आली आहे.
सध्या या पुतळ्यासाठी मोजमाप घेतले जात असून कतरिनाच्या डोळ्यांचा रंग, तिच्या केसांचा रंग अशा बारीकसारीक तपशीलांच्या नोंदी घेण्याचे काम संग्रहालयाच्या शिल्पकार टीमकडून सुरू आहे. कतरिना बॉलिवूडमध्ये प्रसिध्द झाली ती तिच्या आयटम साँगमुळेच. त्यामुळे, पुतळ्यासाठी तिची एखादी गाजलेली नृत्याची पोझ घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. आपल्याच पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी पुढच्या वर्षी कतरिना लंडनमध्ये जाणार आहे. लंडन हे कतरिनासाठी नविन नाही. मात्र, याच लंडनमधील नामांकित संग्रहालयात बॉलिवूडमधील नावाजलेल्या कलाकारांच्या बरोबरीने आपलाही पुतळा उभा राहणार या कल्पनेनेच कतरिना सुखावली असून हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे तिने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा