बॉलिवूडमधील सर्वांत जास्त चर्चेत असणारी जोडी म्हणजे रणबीर आणि कतरिना. दोघांमधील नातेसंबंधापासून ते ब्रेक-अप पर्यंतच्या अनेक चर्चा आजपर्यंत रंगल्या. दोघेही आता आपल्या आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपटसुद्धा अनेक कारणांसाठी चर्चेत राहतोय. जवळपास तीन वर्षांपासून प्रदर्शन रखडलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन रणबीरसोबत करण्यास कतरिनाने नकार दिला होता. मात्र आता चित्रपटासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारत कतरिना आणि रणबीर एकत्र प्रमोशन करू लागले आहेत.

‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत, एकत्र मुलाखती देत आहेत आणि इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर याआधी क्वचित सक्रिय असणारे रणबीर आणि कतरिना आता फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. या मुलाखतींमध्ये अनेकदा दोघांमधील संकोचलेपणा प्रेक्षकांसमोर येतो तर कधी हे दोघे चाहत्यांसमोर एकमेकांची खिल्लीदेखील उडवताना दिसले. प्रमोशनसाठी देत असलेल्या अशाच एका मुलाखतीदरम्यान कतरिनाला एक असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल.

वाचा : ‘नच बलिये ८’ जिंकण्यासाठी दिव्यांकाने दिली ‘स्टार प्लस’ला धमकी?

भविष्यात जर तुला पुन्हा रणबीर कपूरसोबत काम करावे लागले तर तू काय करशील? असा प्रश्न कतरिनाला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला असता ती म्हणाली, ‘पुन्हा आम्ही एकत्र काम करणे हे खूप कठीण आहे. त्याला प्रत्येक गोष्टीवर प्रयोग करणे आवडते हे आता लोकांना कळलेलं आहे. रणबीरनेही आता पुन्हा एकत्र चित्रपटात काम न करण्याबाबत सांगितलं होतं. त्यामुळे पुन्हा हे कधीच होणार नाही.’

कतरिनाच्या या उत्तरामुळे दोघांच्याही चाहत्यांची निराशा नक्कीच झाली असणार. दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री आता चाहत्यांना पाहायला मिळणार नाही असंच म्हणावं लागेल. कतरिना आणि रणबीर दोघेही आपल्या पुढील चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होणार आहेत. ‘टायगर जिंदा है’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांमध्ये कतरिना तर रणबीर संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगन’च्या चित्रीकरणात व्यस्त होणार आहेत.

Story img Loader