गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘धूम ३’ नंतर कतरिनाचे दोन महत्वाकांक्षी चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होतील. ‘धूम ३’साठी केवळ ग्लॅमरस दिसणं ही कतरिनाची गरज होती. मात्र, ‘बँग बँग’ आणि ‘जग्गा जासूस’ या दोन्ही चित्रपटांची शैलीच पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे या दोन्ही चित्रपटातील भूमिकांसाठी कतरिनाला खास वेगळ्या प्रकारची तयारी करावी लागते आहे.
टॉम क्रुझ आणि अँजेलिना जोली यांच्या गाजलेल्या ‘नाईट अँड डे’चा रिमेक असलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटात जागोजागी अ‍ॅक्शनदृश्ये आणि स्टंट्स भरलेले आहेत. या चित्रपटातील अ‍ॅक्शनदृश्यांसाठी तिला हॉलिवूडतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घ्यावे लागलेच पण, या दोन्ही भूमिकांसाठी तिला फिटनेस आवश्यक असला तरी दोन्हीकडे तिला अगदी भिन्न स्वरूपात दिसावे लागणार असल्याने त्यासाठीही वेगवेगळी तयारी ती करते आहे.
‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठीही तिला वेगळ्या प्रकारे फिटनेस राखायचा असल्याने ती ‘पिलेट्स’चे प्रशिक्षण घेते आहे. यास्मिन कराचीवालाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेते आहे. शिवाय, नेहमीचे व्यायाम-कसरती वेगळ्याच. खरेतर, दक्षिण आफ्रिकेत ‘जग्गा जासूस’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. चित्रिकरणाला निघण्याआधी प्रशिक्षणकाळात कसरतींमुळेच तिचे खांदे दुखायला लागले होते. त्यानंतर, डॉक्टरांनी तिला एवढय़ा कडक प्रशिक्षणक्रमाला फाटा देण्यासाठी सांगितले होते. मात्र, एकापाठोपाठ एक लागलेल्या चित्रिकरणाच्या वेळापत्रकामुळे डॉक्टरांचा सल्ला न मानता रोजचा सराव करणे तिला आवश्यक आहे.
‘जग्गा जासूस’ हा रणबीर कपूर आणि अनुराग बसू यांच्या होम प्रॉडक्शनची पहिलीच निर्मिती असल्याने त्या चित्रपटातील भूमिकेसाठी कुठलीही तयारी कमी पडू नये, यासाठी ती काटेकोरपणे सगळ्या गोष्टींचे पालन करते आहे. या एकाच कारणास्तव तिने यावर्षी ‘लॉरिएल’ची प्रतिनिधी म्हणून कान महोत्सवाला जाण्यासही नकार दिला होता. एकूणच, या दोन चित्रपटासाठीची तिची मेहनत तिला यावर्षी आणि पुढच्या वर्षीही लखलाभ ठरेल. कारण, ‘बँग बँग’ यावर्षी प्रदर्शित होणार आहे तर ‘जग्गा जासूस’ प्रदर्शित होण्यासाठी पुढचे वर्ष उजाडेल.

Story img Loader