मराठी संगीतरंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. आपल्या श्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया २०१५’ ( इफ्फी) च्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच विविध प्रकारच्या चित्रपटांसाठी काही विशेष विभाग तयार केलेले असतात. यातील इंडियन पॅनोरमा हा भारतीय भाषांमधील दर्जेदार चित्रपटांसाठीचा एक खास विभाग असून यामध्ये यावर्षी झी स्टुडिओ निर्मित आणि सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची निवड झाली आहे. या निवडीबद्दल दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की, “हा केवळ माझा किंवा या चित्रपटाचा सन्मान नसून तो ख-या अर्थाने कट्यारचे जनक पुरूषोत्तम दारव्हेकर, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा सन्मान आहे. मराठी संगीत नाटकाची एवढ्या मोठ्या स्तरावर दखल घेतली गेली ही गौरवाची बाब आहे. इफ्फीच्या माध्यमातून जगभरातील रसिकांसमोर भारतीय शास्त्रीय संगीताची जादू पसरेल याचा आनंद आहे.”
गोव्यात पार पडणा-या या महोत्सवासाठी तसं कट्यारचं एक वेगळं महत्त्व आहे. कट्यारचं अभिजात संगीत ज्यांच्या सुरांनी आणि स्वरांनी सजलं ते पं. जितेंद्र अभिषेकी यांचं जन्मस्थान गोव्यातील मंगेशी हे गाव. ज्या मातीत या महान कलाकाराचा जन्म झाला त्याच मातीत त्याच्या संगीतावर आधारित एका कलाकृतीचा असा सन्मान होणं हा एक आगळा वेगळा योगच आहे. पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या शब्दांनी सजलेली ‘घेई छंद मकरंद, ‘तेजोनिधी लोह गोल, ‘सुरत पिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने सजलेल्या या गाण्यांना पंडितजींनी स्वर्गीय सुरावटींनी  संगीतबद्ध केलं होतं. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय यात ‘दिल की तपीश’, ‘सूर निरागस हो’, ‘मन मंदिरा’, ‘सूर से सजी संगिनी’, ‘भोला भंडारी’ ह्या नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
येत्या २१ नोव्हेंबरपासून देश विदेशातील अनेक चित्रपटांचा हा महाकुंभ भरतोय. गेल्या वर्षी इंडियन पॅनोरमा विभागात तब्बल ११ चित्रपटांसह मराठीने आपली मक्तेदारी राखली होती ज्यामध्ये एस्सेल व्हिजनच्या (आताचे झी स्टुडिओज्) तब्बल चार चित्रपटांची निवड झाली होती. तर २०१३ मध्ये हा मान एस्सेल व्हिजनच्या ‘फॅंड्री’ला मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा