कविता लाड-मेढेकर

माझ्या अभिनयाची सुरुवात महाविद्यालयापासून झाली. अनेक एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेतला. या कलेची गोडी एकांकिकांमुळेच लागली. आमच्या महाविद्यालयाची एक एकांकिका अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी दिग्दर्शित केली होती. त्यांनीच माझे नाव प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्याकडे चित्रपटासाठी सुचविले. ‘घायाळ’ हा माझा पहिला चित्रपट होता.

ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा काहीच ठरलेले नव्हते. म्हणजे अभिनयकलेत करिअर करायचे की नाही, असा संभ्रम होता. पण याच महाविद्यालयात माझ्यातली अभिनेत्री घडली. मी अकरावीत असताना एकांकिका आली. त्यात माझी मुख्य व्यक्तिरेखा होती. या एकांकिकेसाठी अभिनेत्री म्हणून आयएनटीच्या एकांकिका स्पर्धेत मला प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर बारावीत असताना मी स्वत:हून एकांकिका सादर करणाऱ्या कंपूत गेले. हे करताना महाविद्यालयात एकांकिकेत काम करताना मुख्य भूमिकाच हवीय, असा आग्रह मी कधी धरला नाही. कुठलीही भूमिका मिळाली तरी अगदी मनापासून करायची, धमाल करायची एवढाच विचार तेव्हा मनात असायचा.

नाटकाच्या दरम्यान लक्षात राहिलेली एक आठवण इथे सांगाविशी वाटतेय. एका एकांकिकेत माझ्या सहकलाकाराच्या थोबाडीत मारायचा प्रसंग होता. महाविद्यालयात मी अतिशय शांत विद्यार्थिनी होते. त्यामुळे मारामारी करणे, कुणाशी भांडणतंटा असे प्रकार आयुष्यात कधी घडले नाहीत. पण त्या एकांकिकेत खरे वाटेल, अशी थोबाडीत मारायची होती. पण मी इतक्या बावळटपणे थोबाडीत मारली की त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. आणि ते असे अपेक्षित नव्हते. प्रेक्षकांना ते थोबाडीत मारणे खोटे वाटल्यामुळे हशा पिकला. पण नंतरच्या प्रयोगाला दिग्दर्शक आणि सहकलाकाराने सांगितले, की लागले तरी चालेल पण खरीखुरी थोबाडीत मार. त्यामुळे पुढच्या प्रयोगाला खरीखुरी थोबाडीत मारल्यावर त्या सहकलाकाराच्या गालावर वळ उठला होता. अशी ती फजिती झाली होती.

दिग्दर्शक डॉ. गिरीश ओक यांच्यामुळेच एकांकिकेची, नाटकाची विविध अंगे शिकता आली. नाटकात काम करायचे असेल तर सर्वप्रथम भाषेवर काम केले पाहिजे. भाषेचे उच्चार, मराठी भाषा नीट बोलता येणे किती गरजेचे आहे. हे समजून घेतले. मग नाटकाचे एकेक अंग शिकत गेले. मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले होते. त्यामुळे माझे मराठी उच्चार नीट नव्हते. ते मी फार प्रयत्नांनंतर ते सुधारले. सुंदर मी होणार.. हे माझे पहिले व्यावसायिक नाटक होते. विजय केंकरेंसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला या नाटकासाठी विचारले. इथेही मला शिकायला मिळाले. त्यामुळे चांगले दिग्दर्शक, चांगले सहकलाकार यांच्यामुळे अभिनयासाठी कोणतेही प्रशिक्षण न घेता प्रत्येक भूमिकेतून एकेक गोष्ट शिकत गेले.

एका वळणावर फक्त वर्ग बुडवून धमाल करायची, मजा करायची अशा दृष्टिकोनातून अभिनयाकडे पाहणारी मी एकांकिकांमधून काम करता करता अभिनय करणे आपल्याला मनापासून आवडतेय, या निष्कर्षांप्रत पोहोचले.

रंगमंचावर उभे राहण्याचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन महाविद्यालयीन दिवसांतील एकांकिकांनी दिला. तुडुंब भरलेल्या नाटय़गृहात सादरीकरणाचा अनुभवही तिथेच मिळाला. तोच आत्मविश्वास घेऊन मी आता व्यावसायिक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते आहे. आपल्याला पहिल्यांदा काही सादर करताना जी भीती वाटत असे ती भीती आता राहिली नाही. भीती पळवून लावण्याचे काम एकांकिकांनी केले. मग मी अभिनयात रुळले, त्याचे श्रेय महाविद्यालयाचेच आहे. गेली २५ वर्षे मी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम अनुभवते आहे, त्याची सुरुवात महाविद्यालयातच झाली होती.

शब्दांकन : भक्ती परब

Story img Loader