अमिताभ बच्चन यांचा सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चं दहावं पर्व ४ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी जूनमध्ये अर्ज केला. पण ज्यांना सहभागी होता आलं नाही त्यांनीही निराश होऊ नका. कारण तुमच्या मुलांना ‘केबीसी’मध्ये सहभागी होता येणार आहे. यासाठी शोचे निर्माते ‘किड्स स्पेशल’ आठवडा प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. १० ते १४ वयोगटातील मुलं यामध्ये सहभाग घेऊ शकतात.
असं सहभागी होता येईल किड्स स्पेशल शोमध्ये
१. ‘सोनी लिव’ Sony LIV अॅपवरील ‘केबीसी प्ले’च्या माध्यमातून पालक त्यांच्या पाल्याचा अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची वेळमर्यादा ही २ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आहे.
२. अर्ज करताना वय आणि लिंग लिहिल्यानंतर एका सामान्यज्ञान प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. एका मोबाईल नंबरने एकदाच अर्ज करता येणार आहे. पण तुम्हाला एकापेक्षा अधिक पाल्य असतील, तर तीन पाल्यांचे अर्ज तुम्ही भरू शकता. रेजिस्ट्रेशन पेजवर पाल्यांची संख्या निवडण्याचा पर्याय आहे. त्याठिकाणी प्रत्येक पाल्याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
केबीसीच्या किड्स स्पेशल आठवड्यासाठी निवड झालेल्या मुलांना अर्ज केल्यानंतर पाच दिवसांत फोनकॉल येईल. त्यानंतर ऑडीशन्स पार पडतील. दिल्लीतील ऑडीशन्स १६ ऑक्टोबर तर मुंबईतील ऑडीशन्स १८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहेत. ऑडीशन्सच्या तारखेत बदल होऊ शकतात. त्यानुसार स्पर्धकांना कल्पना दिली जाईल.