छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ ला ओळखले जाते. ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या पर्वातील पुढच्या भागात ‘शोले’ या चित्रपटातील कलाकार हजेरी लावणार आहेत. या शो चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी हेमा मालिनी यांना अनेक प्रश्न विचारले. “महिला बाहेर जातेवेळी त्यांच्याकडे छोटीशी पर्स असते, या पर्समध्ये नेमके काय असते?” असा प्रश्न अमिताभ यांनी हेमा मालिनी यांना विचारला. या प्रश्नावर हेमा मालिनी यांनी फार मजेशीर उत्तर दिले.
‘कौन बनेगा करोडपती’ या शोला विशेष महत्व प्राप्त झालंय ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे. बॉलिवू़डचे महानायक हा शो होस्ट करत असल्यामुळे या शोला चार चाँद लागले आहेत . या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. येत्या शुक्रवारी ‘शोले’ या चित्रपटाची टीम केबीसीमध्ये सहभागी होणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमो अमिताभ यांनी हेमा मालिनी यांना महिलांबद्दल एक खासगी प्रश्न विचारला. “अनेक महिलांकडे एक छोटी पर्स किंवा बॅग असते. ही बॅग ते घराबाहेर जाताना त्यांच्यासोबत ठेवतात. मात्र त्यात नेमंक काय असते?” असा सवाल अमिताभ यांनी विचारला.
त्यांचा हा प्रश्न विचारल्यानंतर हेमा मालिनी या गालातल्या गालात हसू लागल्या. यावर त्या म्हणाल्या, “महिलांच्या त्या छोट्या बॅगेत एक कंगवा, लिपस्टिक आणि फार कमी पैसे असतात.” हेमा मालिनीच्या या उत्तरवर बिग बी हे थोडे गोंधळून जातात. मात्र त्यानंतर ते पुन्हा हेमा मालिनींना प्रश्न विचारतात.
“पण साधारणत: महिला या घराबाहेर पडण्यापूर्वी मेकअप किंवा साजशृंगार करतात. मग तरीही त्या छोट्या बॅगेत ते या गोष्टी का घेऊन फिरतात?” यावर पुन्हा हेमा मालिनी म्हणाल्या, “मेकअप केल्यानंतर थोडा टचअप करावा लागतो. त्यामुळे या वस्तू महिला घेऊन फिरतात.”
दरम्यान ‘शोले’ चित्रपटाला यंदा ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केबीसीच्या सेटवर हा खास शो रंगणार आहे. ‘शोले’ हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, एके हंगल आणि अमजद खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. केबीसीच्या निमित्ताने ‘शोले’ चित्रपटासंबंधित पुन्हा एकदा अनेक आठवणी ताज्या होणार आहेत.