भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक मानला जातो. रोहितचा एक वेगळा चाहता वर्ग असून मैदानावरील कामगिरीबरोबरच सोशल नेटवर्किंग आणि खासगी आयुष्यातही रोहित संदर्भातील सर्व माहिती ठेवणारे त्याचे अनेक चाहते आहेत. भारतीय संघाचा हिटमॅन म्हणून रोहित शर्मा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. अमिताभ बच्चन होस्ट करत असणाऱ्या कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या सिझनमध्ये रोहितचा एक जबरा फॅन हॉटसीटवर पोहचलाय. प्रांशु त्रिपाठी असं या चाहत्याचं नाव असून तो रोहित शर्माचा फार मोठा चाहता आहे. प्रांशु रोहितला एवढा मनतो की त्याच्या पाकिटामध्ये रोहितचा फोटो आहे. रोहितला त्याने अगदी देवाची उपमाही दिल्याचं पाहयला मिळालं.
अमिताभ यांनी प्रांशुला त्याची प्रेयसी आणि रोहित शर्मा या दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगितलं तेव्हा प्रांशुने हा तर सात कोटीपेक्षा कठीण प्रश्न असल्याचं म्हणतं यासाठी लाइपलाइनही नसल्याचं म्हटलं.
रोहितबद्दल प्रांशुला वाटणारं प्रेम पाहून अमिताभ यांनी थेट रोहितला व्हिडीओ कॉल केला. रोहितला व्हिडीओ कॉलवर पाहून प्रांशु फारच भावूक झाला. आपण रोहितशी बोलणार आहोत याची त्याला कल्पनाच नव्हती. प्रांशुच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून रोहितसुद्धा चकित झाला.
समोर रोहितला पाहून प्रांशुला काय बोलावं कळत नव्हतं. आपण आता एक फोन कॉल लावणार आहोत असं अमिताभ यांनी म्हटल्यानंतर प्रांशुच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. ‘रोहित शर्मा’ असं अमिताभ यांनी जाहीर केल्यानंतर प्रांशुला सुखद धक्काच बसला. रोहितला पाहताच त्याने हात जोडून नमस्कार केला. तो आपल्या हॉटसीटवरुन उठून उभा राहिला त्याने खाली वाकून रोहितला अभिवादन केलं.
“तुम्हाला विश्वास बसणार नाही ते तुमचे किती मोठे चाहते आहेत. तुम्ही बोला तुमच्यासमोर रोहित आहे,” असं अमिताभ यांनी म्हटलं. त्यावर प्रांशुने, “सर देवाबरोबर कोण बोलतं?” असा प्रतिप्रश्न केला असता अमिताभ यांनी हसून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. तर समोर हे संभाषण ऐकणाऱ्या रोहितने हात जोडून “अरे..” असं म्हणत चाहत्याच्या या कॉम्प्लिमेंटचा स्वीकार केला. रोहितने प्रांशूला तुम्ही खूप मोठी रक्कम जिंकून जावी अशी अपेक्षा करतो असं सांगत शुभेच्छा दिल्या.
प्रांशु मध्य प्रदेशमधील एका लहानश्या शहरामध्ये गणिताचे शिक्षक म्हणून काम करतो. मी पेशाने शिक्षक असलो तरी मनाने क्रिकेटपटू आहे असं प्रांशु सांगतो. प्रांशु एक कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.