‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वामधील गुरुवारच्या भागामध्ये रोल ओव्हर कंटेस्टंट असणाऱ्या कोमल गुप्ता यांनी ५० लाख रुपये जिंकले. वेट लिफ्टिंगपटू असणाऱ्या कोमल यांनी राष्ट्रीय स्तरावर पदकंही जिंकली आहेत. वयाच्या ११ व्या वर्षापासून वेट लिफ्टींग करणाऱ्या कोमल यांचे प्रेरणास्त्रोत त्यांचे वडीलच असल्याचं कार्यक्रमात सांगितलं. आपल्या सगळ्याच लाइफलाइनचा अगदी योग्य पद्धतीने वापर करुन कोमल यांनी ५० लाख रुपये जिंकले. मात्र ७५ लाखांच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडकली आणि त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

ऑडियन्स पोल, ५०-५० आणि फोन अ फ्रेण्ड या सर्वच लाइफलाइनच्या माध्यमातून कोमल यांनी जिथे अडचण वाटली तिथे मदत घेत ५० लाखांपर्यंत मजल मारली. त्यांनी वापरलेल्या सर्वच लाइफलाइनची त्यांना मदत झाली. त्यांच्या मामांनी त्यांना फोन अ फ्रेण्डच्या माध्यमातून २५ लाख जिंकण्यासाठी मदत केली. ५० लाखांच्या प्रश्नाचंही त्यांनी योग्य उत्तर दिलं. लाइफलाइन नसताना केवळ वाचनाच्या जोरावर आपल्याला याची कल्पना आहे असं म्हणत त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे ओडिशामधील मंत्रीमंडळात असतानाच परिवहन खात्याची जबाबदारी असल्यासंदर्भातील प्रश्नाला योग्य उत्तर देत ५० लाख जिंकले. कोणतीही लाइफलाइन शिल्लक नसताना त्यांनी हे उत्तर दिलं. मात्र ७५ लाखांच्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल त्यांना काहीही कल्पना नव्हती.

अमिताभ बच्चन यांनीही कोमल यांच्या खेळाचं कौतुक करत तुम्ही पर्याय बाजूला काढण्याचं काम अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे विचारपूर्वक करता असं म्हटलं. कोमल यांनी ७५ लाखांच्या प्रश्नासंदर्भातही हे तर्क वापरलं होतं. मात्र ५० लाखांवरुन थेट साडेतीन लाखांवर येण्याचा धोका त्यांनी पत्कारला नाही. त्यांनी दोन पर्यायांमध्ये गोंधळ होत असल्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ७५ लाखांसाठी विचारलेला प्रश्न काय होता पाहूयात…

१९७३ साली अराबेला आणि अनीटा नावाचे दोन जीव अंतराळामध्ये काय करणारे पहिले सजीव ठरले?
ए) घरटं बनवणं
बी) जाळं विणणे
सी) पंखांचा वापर करुन उडणे
डी) जन्म देणे

यासंदर्भात विचार करताना कोमल यांनी घरटं बांधणं अंतराळात शक्य नाही आणि जन्म देणंही शक्य नाही असं म्हणत आपल्याला बी आणि सी पर्यायासंदर्भात संभ्रम असल्याचं सांगितलं. मात्र धोका न पत्करता त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. खेळ सोडल्यानंतर कोमल यांनी सी असं उथ्तर दिलं. हे उत्तर चुकीचं निघालं. या प्रश्नाचं उत्तर जाळं विणणे असं होतं. कोमल यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मोठा फटका बसला नाही.

एका विद्यार्थ्याच्या सल्लानुसार १९७३ साली अराबेला आणि अनीटा नावाचे दोन कोळी अंतराळात पाठवण्यात आलेले. जाळं विणण्याच्या आपल्या कौशल्यासाठी ओळखला जाणारा हा कीटक अंतराळामध्येही पृथ्वीप्रमाणेच जाळं विणू शकतो का यासंदर्भातील संशोधनासाठी या जीवांना अंतराळात पाठवण्यात आलेलं. या कोळ्यांनी जाळं विणलं मात्र ते पृथ्वीवरील जाळ्याच्या तुलनेत फारच कमकुवत होतं. जाळं विणल्यानंतर या कोळ्यांचा मृत्यू झाला, अशी अतिरिक्त माहिती अमिताभ यांनी दिली.

Story img Loader