‘कौन बनेगा करोडपती’ शोचा प्रत्येक भाग खूप रंजक असतो. प्रत्येकजण खूप तयारी करून या शोमध्ये येतो. पण कधी कधी त्यातही चूक होते. म्हणजे स्पर्धक घाईघाईत अगदी साध्या प्रश्नांचीही उत्तरे देऊ शकत नाहीत. अनेकदा ते गोंधळून जातात. नुकत्याच एका भागात असंच काहीसं घडलं. बिग बींनी स्पर्धकांना खूपच सोपा प्रश्न विचारला पण त्यांना उत्तर देता आलं नाही. यामुळे बिग बीसुद्धा चकित झाले. हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
कौन बनेगा करोडपती १४ चे होस्ट अमिताभ बच्चन यांना खेळ सुरू करायचा होता. यासाठी त्याला हॉटसीटवर कोणाची ना कोणाची गरज होती. यासाठी त्यांनी फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट राउंड सुरू केला. पण राउंडमधील एका सोप्या प्रश्नाचं कोणीच देऊ शकलं नाही. विशेष म्हणजे हा प्रश्न आपल्याच देशाशी संबंधित होता.
आणखी वाचा- “मी स्वतःला खूप हुशार समजायचो पण…” केबीसी १४ च्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी मान्य केली त्यांची चूक
केबीसीच्या फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट राउंडमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न असा होता-
यापैकी कोणते ठिकाण नवी दिल्लीपासून सर्वात लांब आहे?
अ) बंगळुरू
ब) पुणे<br>क) हैदराबाद
ड) भुवनेश्वर
या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय ‘अ – बंगळुरू’ असा आहे. किती जणांनी बरोबर उत्तर दिले हे जेव्हा बिग बींनी पाहिलं तेव्हा त्यांना स्क्रिनवर एकही नाव दिसलं नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर तर सोडाच पण चुकीचे उत्तरही कोणी दिलं नाही. म्हणजेच ८ स्पर्धकांपैकी कोणालाही या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तेव्हा अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी सर्वांना विचारलं, “सर्व भारतातील आहेत की बाहेरचे आहेत. कोणीही उत्तर दिले नाही.” त्यांच्या या बोलण्यावर सर्वजण खळखळून हसले.