केरळच्या कोळिकोड येथील रुग्णालयाने त्यांच्या स्किनकेअर उपचार सुविधेचा प्रचार करण्यासाठी ऑस्कर विजेते अभिनेता मॉर्गन फ्रीमन यांचा फोटो वापरल्याबद्दल माफी मागितली आहे. या जाहिरातीमुळे खळबळ उडाली होती. अनेकांनी ती ‘वर्णद्वेषी आणि अज्ञानी’ असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.

जाहिरातीमध्ये ८४ वर्षीय अभिनेते मॉर्गन फ्रीमन यांना दाखवण्यात आले होते आणि “तुमच्या त्वचेचे टॅग, DPN, वॉर्ट्स, मिलिया, मोलस्कम आणि कॉमेडोन हे एकाच उपचारात सहज आणि सोप्या प्रक्रियेद्वारे काढा,” असं त्यावर लिहिलं होतं. ही जाहीरात व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी फोनवर बोलताना, वडकारा कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड टी सुनील म्हणाले, “एक त्वचा तज्ज्ञ अलीकडेच आमच्या आउट पेशंट विभागात रुजू झाले. रूग्णालयात स्किनकेअर उपचार सुविधा आहेत, याची प्रसिद्धी व्हावी, यासाठी फलक लावून चार दिवस तेथे ठेवण्यात आले होते. एका स्थानिक डिझायनरने ते तयार केले होते. ज्ञान आणि गांभीर्य नसल्यामुळे बेफिकीरपणे ओपीडीसमोर फलक लावण्यात आला. याच दरम्यान, एका व्यक्तीने या जाहिरातीसाठी नेल्सन मंडेला यांचा फोटो का छापला आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर प्रकरण लक्षात आलं आणि शनिवारी आम्ही ते फलक काढून टाकले.”

फ्रीमन यांनी २००९मध्ये हॉलिवूड चित्रपट इन्व्हिक्टसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे दिवगंत नेते नेल्सन मंडेला यांची भूमिका साकारली होती.

“दरम्यान, रविवारी ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. आम्ही फेसबुकवर झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आम्ही समजतो की फ्रीमन हे एक महान कलाकार आहेत, त्यांचे जगभरात चाहते असून लोक त्यांची प्रशंसा करतात. ज्ञानाच्या अभावाबद्दल आम्ही प्रामाणिकपणे दिलगीर आहोत,” असं सुनील म्हणाले.

फेसबुकवर पोस्ट केलेल्या हॉस्पिटलच्या माफीचे नेटिझन्सनी स्वागत केले. “चुका होऊ शकतात…त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या..”, असे एका युजरने मल्याळममध्ये लिहिले.

Story img Loader