अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा २०१९ मधला बॉलिवूडमधला सर्वाधिक वेगाने १०० कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. गेल्या तीन महिन्यांत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’, ‘ठाकरे’, ‘टोटल धमाल’, ‘बदला’, ‘लुकाछुपी’, ‘गली बॉय’ यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. या सर्व चित्रपटात बॉलिवूडमधले आघाडीचे कलाकार होते मात्र या चित्रपटांना १०० कोटींचा गल्ला जमवण्यास एका आठवड्याहून अधिकचा वेळ लागला. मात्र ‘केसरी’ने सात दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

अक्षय कुमारचा ‘केसरी’ २१ मार्चला प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटानं २१ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला लाभला. सारागढीच्या युद्धावर हा चित्रपट आधारलेला आहे. इतिहासात लढलेलं सर्वात धाडसी युद्ध अशा शब्दात या युद्धाचं कौतुक केलेलं पहायला मिळतं. भारतातील ३,६०० स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सात दिवसांत एकूण १००.०१ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या रणवीर आलियाच्या ‘गलीबॉय’ने ८ दिवसांत १०० कोटींची कमाई केली होती. तर ‘टोटल धमाल’ चित्रपटाने ९ दिवसांत १०० कोटी कमावले होते. कमी दिवसांत सर्वाधिक कमाई करण्याचा ‘केसरी’चा विक्रम आगामी काळात मोडला जाऊ शकतो यात शंकाच नाही. कारण आगामी काळात सलमान खान, कंगाना रणौत, रणवीर सिंगचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

Story img Loader