तरुणाईला आपल्या अवीट सुरांनी मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर आणि राहुल वैद्य. स्टार प्रवाह वाहिनीवर ११ मार्चपासून सुरु होणाऱ्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेचं शीर्षकगीत राहुल आणि केतकीच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय. सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने या गाण्याला संगीत दिलं असून गीतकार श्रीपाद जोशीच्या लेखणीतून हे गाणं साकारलंय.

या टायटल ट्रॅकविषयी सांगताना केतकी म्हणाली, ‘साथ दे तू मला मालिकेच्या निमित्ताने खूप सुंदर गीत गाण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. राहुल वैद्यसोबत हे गाणं गाताना खूपच मजा आली. गाण्याचे शब्द खूप सुंदर आहेत आणि निलेश मोहरीर यांनी अप्रतिम संगीत दिलं आहे. माझ्या आजवरच्या गाण्यांपैकी हे खूपच स्पेशल गाणं आहे. प्रेक्षकांच्या मनावर हे गाणं नक्कीच रुंजी घालेल याची मला खात्री आहे.’ अशी भावना केतकी माटेगावकरने व्यक्त केली.

राहुल वैद्य या गाण्याविषयी म्हणाला, ‘एखादी चाल जशी मनात घर करुन जाते तसंच काहीसं या गाण्याच्या बाबतीत म्हणता येईल. मला स्वत:ला हे गाणं खूप आवडलं आहे. स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे बंध घट्ट झाले आहेत.’

‘साथ दे तू मला’ ही गोष्ट आहे प्राजक्ताच्या स्वप्नांची. फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचंय अगदी लग्नानंतरसुद्धा. करिअरसाठी सबकुछ कुर्बान असं मानणाऱ्यातली ती नाही. घर-संसार सांभाळून तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. खरंतर घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत कुशलरित्या सांभाळणाऱ्या तमाम स्त्रियांचं प्राजक्ता प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच ‘साथ दे तू मला’ या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल. प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल.

आशुतोष कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सविता प्रभुणे, अरुण नलावडे,मेघना वैद्य, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. ‘साथ दे तू मला’ ११ मार्चपासून सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Story img Loader