सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या पहिल्या मराठी पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केतकी जाणार असं म्हटलं जात आहे. या सर्व चर्चांवर स्वत: केतकीने खुलासा केला आहे. यासंदर्भात इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने एक पोस्ट लिहिली आहे.

इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये केतकीने लिहिलं, ‘बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मलासुद्धा बिग बॉस पाहायला खूप आवडतं आणि मीसुद्धा दुसऱ्या पर्वासाठी खूप उत्सुक आहे. मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण ही फक्त अफवा आहे. या वर्षी माझा असा कोणताच प्लॅन नाही. पण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.’

https://www.instagram.com/p/Bvqi2UFFVuw/

वाचा : ..जेव्हा वहीदा रहमान बिग बींच्या कानशिलात लगावतात

केतकीच्या या पोस्टमुळे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात ती सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण या शोमध्ये इतर कोण झळकणार हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरं पर्व कधीपासून सुरू होणार आणि त्याचं सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.

Story img Loader