बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर यशस्वीपणे मात करत संजय दत्तनं पुन्हा चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला त्याचा ‘केजीएफ २’ हा चित्रपट सध्या खूप गाजताना दिसतोय आणि संजयनं साकारलेल्या खलनायकाचं बरंच कौतुकही होताना दिसतंय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तनं त्याच्या कॅन्सरच्या अनुभवाबद्दल सांगितलं.
ऑगस्ट २०२० मध्ये संजय दत्तला स्टेज ४ कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी देशभरात करोनाची लाट पसरली होती. कॅन्सरच्या अनुभवाबद्दल सांगताना संजय दत्त म्हणाला, ‘त्या दिवशी सकाळी मी उठलो तो एक सामान्य दिवस होता. पण घरातच पायऱ्या चढत असताना मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी अंघोळ केली. पण तरीही मला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी माझ्या डॉक्टरांना फोन केला. त्यानंतर काही टेस्ट झाल्या. एक्स-रेमध्ये माझ्या फुफ्फुसात पाणी असल्याचं दिसून आलं. अर्ध्यापेक्षा जास्त जागा पाण्यानं व्यापली होती. डॉक्टरांनी सांगितलं की पाणी काढावं लागेल. सुरूवातीला सर्वांना वाटलं की हा टीबी असेल पण नंतर कॅन्सरचं निदान झालं.’
आणखी वाचा- अपघातानंतर आता ‘अशी’ दिसतेय मलायका अरोरा, पहिल्यांदाच शेअर केला सेल्फी
संजय पुढे म्हणाला, ‘जेव्हा डॉक्टरांना हे समजलं तेव्हा मला सांगायचं कसं हा त्यांच्यासाठी मोठा टास्क होता. कारण मला दुसऱ्या कोणी सांगितलं असतं तर रागात मी त्याला ठोसा लगावला असता. पण माझी बहीण माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं संजय तुला कॅन्सर आहे आता काय करायचं? जेव्हा असं काही होतं तेव्हा आपण पुढच्या गोष्टी ठरवायला सुरुवात करतो पण मी त्यावेळी जवळपुास २-३ तास रडत बसलो होतो. माझ्या डोक्यात माझी मुलं आणि पत्नीबद्दल विचार येत होते. सर्वकाही समजल्यावर मला खंबीर राहायचं होतं. मला परदेशात जाण्याची परवानगी नाकारली गेली तर मी आपल्याच देशात उपचार घ्यायचं ठरवलं. हृतिक रोशनच्या वडिलांनी एका डॉक्टरांचं नाव सुचवलं आणि मग माझ्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुला उलट्या होतील तुझे केस जातील. त्यानंतर भारतात उपचार घेऊन मी केमोथेरपीसाठी दुबईला गेलो. तिथे मी सायकल चालवत असे. दोन- तीन तास बॅडमिंटन खेळत असे. आज मी कॅन्सर फ्री आहे.’
आणखी वाचा- “माझ्या छोट्या केसांमुळे नकारात्मक…” मंदिरा बेदीनं केला धक्कादायक खुलासा
संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘केजीएफ चॅप्टर २’ अलिकडेच प्रदर्शत झाला आहे. या चित्रपटात संजय दत्तनं ‘अधीरा’ ही खलनायकी भूमिका साकारली आहे. ज्याचा लुक आणि अभिनय सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. या चित्रपटात संजय दत्त दाक्षिणात्य सुपरस्टार यश सोबत स्क्रीन शेअर केली आहे.