दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. १४ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तमिळ, तेलुगूसह या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननंही बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये थोडी घट झाली असली तर जगभरात या चित्रपटानं आतापर्यंत कमाईचा मोठा आकडा पार केला आहे.
‘केजीएफ चॅप्टर २’ची भारतातील पाचव्या दिवसाची कमाई २१५ कोटी एवढी होती. तर मंगळवारी म्हणजेच सहाव्या दिवशी या चित्रपटानं ३७.२६ कोटी रुपयांची कमाई केली. तर मागच्या ६ दिवसांमध्ये जगभरात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ६७६.८० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं सहाव्या दिवशी १९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र पाचव्या दिवसाच्या तुलनेत सहाव्या दिवशी या कलेक्शनमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवून आहे.
आणखी वाचा- “यासाठी १० वर्षं लागली पण…” तापसी पन्नूनं शाहरुख खानबाबत केलेलं ट्वीट चर्चेत
प्रशांत नील यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं इतर भाषांमध्येही चांगलं प्रदर्शन केलं आहे. कर्नाटकमध्ये सहाव्या दिवशी या चित्रपटानं ६ कोटींची कमाई केली तर हैदराबादमध्ये हा आकडा ५.६० कोटी एवढा होता. याशिवाय केरळमध्ये ४.५० कोटी, तमिळनाडूमध्ये ६ कोटी एवढी कमाई केली. सर्व भाषांमधील एकूण कलेक्शन हे ३७.२६ कोटी एवढं आहे.
तसेच एकट्या हिंदी व्हर्जननं ६ दिवसांमध्ये २३४.५० कोटी एवढा गल्ला जमवला आहे. तब्बल ४ हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.