रसिका शिंदे-पॉल

रसिक प्रेक्षकांच्या डोळय़ासमोर आजही ‘जय मल्हार’ किंवा खंडेरायाचे नाव घेतले की देवदत्त नागे हाच अभिनेता खंडेरायाच्या रूपात उभा राहतो. ‘मृत्युंजय: कर्णाची अमरगाथा’ या मालिकेत दुर्योधनाची नकारात्मक भूमिका साकारत देवदत्त नागे याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘देवयानी’, ‘डॉक्टर डॉन’, ‘वीर शिवाजी’, ‘कालाय तस्मैय नम:’ अशा अनेक मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारलेला मराठी अभिनेता देवदत्त नागे सध्या ‘आदिपुरुष’ या आगामी हिंदी चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देवदत्तने ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’, ‘सत्यमेव जयते’, ‘तानाजी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. मात्र त्याच्या लोकप्रियतेत त्याने साकारलेल्या पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा मोलाचा वाटा राहिला आहे.  

तरुण पिढीला हनुमानाची ओळख व्हावी म्हणून..

 ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारल्यानंतर पुन्हा एकदा देवाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमाप आनंद झाला आहे, असे देवदत्त म्हणतो. ‘‘आदिपुरुष चित्रपटात मला हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली ती सर्व मारुतीरायाची कृपा आहे. प्रभू राम यांची निस्सीम सेवा करणाऱ्या हनुमानाचे चरित्र कुठेतरी लोप पावते आहे असे निदर्शनास आल्यामुळे आणि आजच्या तरुण पिढीला त्यांचे चरित्र कळावे असा या चित्रपटाचा आणि माझ्या भूमिकेचा उद्देश आहे’’, असे देवदत्तने सांगितले. ‘‘ खूप कमी जणांना माहिती आहे की मी देवभोळा आहे; आणि हनुमान हा माझ्या विशेष जवळचा आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ज्यावेळी मला हनुमानाचा पेहराव घातला जायचा त्यावेळी मी खरंच भारावून जायचा’’, अशी चित्रीकरणाची आठवणही त्याने सांगितली. 

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रभावी दिग्दर्शनाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक ओम राऊत यांच्याबरोबर देवदत्तने ‘तानाजी’ चित्रपटात काम केले होते. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली याबद्दलचा खास अनुभव देवदत्तने सांगितला. ‘‘आदिपुरुष या चित्रपटासाठी ओम राऊत यांनी मला विचारले होते. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला होता. मी कोणती भूमिका साकारणार होतो हेही मला माहिती नव्हते. काही दिवसांनी जेव्हा मी त्यांना विचारले की माझी भूमिका कोणती आहे?  त्यावर ते म्हणाले, तुझ्या भूमिकेविषयी सांगितलं तर तू आनंदाने रडशील. आणि हे ऐकताच माझ्या डोळय़ांसमोर मारुतीरायाची प्रतिमा उभी राहिली. त्यानंतर माझी भूमिका ही मारुतीरायाचीच आहे हे समजल्यावर ती साकारण्यासाठी मी ताकदीने तयारी करू लागलो.’’ कोणतीही भूमिका साकारताना ज्यांची व्यक्तिरेखा आपण साकारणार आहोत त्यांचे आशीर्वाद घेऊन सुरुवात करावी, कारण ज्यांचे चरित्र आपण साकारणार आहोत त्यांच्या कार्याला न्याय देणं ही प्रत्येक कलाकाराची नैतिक जबाबदारी आहे असे देवदत्त मानतो. 

मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या बरोबरीने आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दुरावादेखील कमी होत चालला आहे. याची प्रचीती यापूर्वीदेखील अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आली आहे. पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा तिन्ही भाषेतील कलाकार एकत्रितरीत्या मोठय़ा पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. याबद्दल देवदत्त म्हणतो, कोणताही कलाकार प्रत्येक भूमिकेतून आणि कोणत्याही भाषेतील त्याच्या कलाकृतीतून त्याची छाप पाडत असतो. अभिनयाला भाषेची सीमा नसते. भारतीय चित्रपटासाठी प्रत्येक भाषेतील चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी योगदान देणे गरजेचे आहे; त्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टी जगाच्या पाठीवर अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी प्रत्येक भाषिक कलाकाराने प्रयत्नशील राहणे गरजेचे ठरणार आहे. ‘अभिनय करताना अडथळा आला नाही तर आपण सचोटीने काम करू शकत नाही, त्यामुळे काम करताना येणारा प्रत्येक अडथळा, आव्हान कलाकाराला काहीतरी शिकवून जाते,’ असेही त्याने सांगितले.

बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचा आनंद आहे असे सांगतानाच देवदत्तने यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभवही सांगितला. ‘‘सैफ अली खानसोबत यापूर्वी ‘तानाजी’ चित्रपटात काम केले होते, त्यामुळे या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना आपलेपणा अधिक वाटत होता. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटवर अनोळखीपणा नसल्याने भूमिका साकारताना आत्मविश्वास वाटत होता. तर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली असून त्यांच्याबरोबर काम करताना अनुभवही अविस्मरणीय होता,’’ असे देवदत्तने सांगितले. प्रभास यांच्या डोळय़ांमध्ये संयमीपणा आणि क्रोध या दोन्ही भावनांचा मिलाफ दिसत असल्याचेही देवदत्तने सांगितले. चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान कुठेही प्रभास आणि सैफ अली खान यांनी आपण सुपरस्टार आहोत असा आव आणला नाही, त्यांच्यासोबत मोठय़ा पडद्यावर काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगत देवदत्तने दोन्ही कलाकारांचे भरभरून कौतुक केले.