‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हैद्राबाद कस्टडी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट गुन्हेगार आणि पोलीस यांच्यावर आधारित आहे.
ख्वाडा या चित्रपटानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘बबन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘बबन’ या चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा त्यांनी मांडली होती. त्यांच्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता ते त्यांचा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत.
https://www.instagram.com/p/BvQux_XJddP/
वाचा : लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर सलमान खान म्हणतो..
‘हैद्राबाद कस्टडी या चित्रपटाची सगळी स्टारकास्ट नवीन असून एक वेगळा विषय या चित्रपटाद्वारे आम्ही हाताळणार आहोत. या चित्रपटाला संगीत ओमकार स्वरूप, रोहित नागभिरे देणार आहेत. या दोघांनीही या आधी माझ्यासोबत काम केलेले आहे,’ असं कऱ्हाडे यांनी सांगितलं.
भाऊराव कऱ्हाडे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. ख्वाडा या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच त्यांच्याकडे असलेला पैसा संपला होता. शेवटी त्यांनी त्यांची शेतजमीन विकून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. राष्ट्रीय पुरस्काराने त्यांच्या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता ‘हैद्राबाद कस्टडी’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.