पदार्पणातच चर्चेत आलेल्या भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट येत्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे एक दिवस अगोदर गुरुवारी २२ ऑक्टोबरला रसिकांसाठी चित्रपगृहात दाखल होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे ‘ख्वाडा’ प्रस्तुत करण्यासाठी पुढे आले असून, त्यांच्यासह चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक आणि निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी ही घोषणा केली. यावेळी चित्रपटाचा नायक महाराष्ट्राचा नवा नादखुळा रांगडा मर्द गडी अर्थात भाऊसाहेब शिंदे तसेच चित्रपटातील मुख्य कलाकार शशांक शेंडे, आणि आगळा वेगळा कलावंत अनिल नगरकर यांची विशेष उपस्थित होती. येत्या दसऱ्याला म्हणजेच २२ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये ‘ख्वाडा’ प्रदर्शित होणार असून, राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांसोबातच प्रभात पुरस्कारांमध्येही ख्वाडा वरचढ ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसोबातच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावामाध्येही ख्वाडा च्या तांबड्या मातीची उधळण सुरु आहे.
‘ख्वाडा’ चित्रपटावर ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साऊंड’ अश्या दोन राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटली आहे. यांशिवाय उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे ५ राज्य पुरस्कार मिळाले असून, २०१५ च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. यांशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात २०१५’ चार पुरस्कार मिळाले आहेत. तसेच काही संस्था हा चित्रपट विदेशात प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव घेऊन येत असून त्यावर महाराष्ट्रातील प्रदर्शानंतर काम सुरु होईल.
भाऊराव यांची चित्रपट निर्मितीची धडपड पाहून आघाडीचे कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी पुढे येऊन, हा चित्रपट प्रस्तुतीचा निर्णय घेतला. नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये, प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळालेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाचे कलादिग्दर्शक निर्माते असणारे चंद्रशेखर मोरे यांनी हिंदी चित्रपट ‘रॉक ऑन’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘दिल धडकने दो’, ‘दिल्ली बेल्ली’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे आणि आगामी ‘रईस’ या चित्रपटाचे कलादिग्दर्शन केले आहे. तसेच अठराशेहून अधिक जाहिरात पटांसाठी आपले कलाकौशल्य पणाला लावले आहे. मराठी चित्रपट आणि मराठी साहित्य हा मोरे यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय असून, त्याचमुळे मोरे हे कायम धडपड करणाऱ्या तरुण दिग्दर्शक कलावंतांच्या पाठीशी ठाम उभे राहतात. याच भावनेतून, त्यांनी २००९ मध्ये ‘अनोळखी हे घर माझे’ या सचिन देव दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा