बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टही अनेकदा व्हायरल होत असतात. अलिकडेच कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. आता हा व्हिडीओ आणि त्यावरून झालेल्या ट्रोलिंगवर कियारानं स्पष्टीकरण दिलं आहे.
कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी जात असतानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर सेक्युरिटी गार्ड कियाराला सॅल्युट करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे कियाराला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं. कियारानं वयस्कर व्यक्तीला सॅल्युट करायला लावला असं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.
या संपूर्ण प्रकारणावर आतापर्यंत शांत असलेल्या कियारानं आता मात्र मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत बोलताना ती म्हणाली, ‘मला आठवतंय माझ्यासोबत असं घडलं होतं. मी कुठेतरी जात होते. तिथे काही फोटोग्राफर्सनी माझे फोटो क्लिक केले. त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या व्हिडीओमध्ये सेक्युरिटी गार्ड मला सेल्युट करताना दिसत आहेत. ते वयस्कर होते. पण मी त्यांना असं करण्यासाठी सांगितलं नव्हतं. ते एक चांगले व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांनी असं स्वतःहून केलं.’
कियारा पुढे म्हणाली, ‘मी देखील त्यांना हसून उत्तर दिलं होतं. जेव्हा अशा प्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो काढले जातात, तेव्हा तुम्हाला माहीत नसतं २ व्यक्ती एकमेकांसोबत काय बोलत आहेत. पण त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. मी विचार करते हेच जर एखाद्या अभिनेत्यासोबत घडलं असतं तर त्याला असं ट्रोल केलं गेलं नसतं. कधी कधी काहीच कारण नसताना तुम्हाला ट्रोल केलं जातं.’
कियाराच्या कामाबाबत बोलायचं तर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ चित्रपटात दिसली होती. आगामी काळात ती ‘जुग जुग जियो’, ‘RC15’, ‘गोविंदा मेरा नाम’ आणि ‘भूल भुलैय्या २’ हे तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.