काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्यात हिंदी भाषेवरून वाद झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना किच्चा सुदीपनं, “हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही.” असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत अभिनेता अजय देवगणनं एक ट्वीट केलं होतं. त्यानंतर हा मुद्दाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड अशा दोन भागात अभिनय क्षेत्र विभागलं गेलं. कलाकार, राजकीय नेते यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. आता या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर किच्चा सुदीप या वादावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिकडेच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले, “मागच्या काही दिवसांपासून मी पाहतोय देशात भाषांवरून वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लोकांनी आता जागरुक होण्याची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांना दिलेले प्राधान्य सर्व प्रादेशिक भाषांप्रती आमची बांधिलकी दर्शवते. भाजप भारतीय भाषांना भारतीयत्वाचा आत्मा आणि देशाच्या चांगल्या भविष्याचा दुवा मानते. मी याचा उल्लेख या ठिकाणी करत आहे कारण अलिकडच्या काही काळात भाषांच्या मुद्द्यावर नवे वाद सुरू करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. यामुळे आता आपल्याला आता देशातील नागरिकांना जागरुक करण्याची गरज आहे.”
आणखी वाचा- सलमान खान- आयुष शर्मामध्ये वाद? भाईजानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मधून अभिनेता बाहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेनंतर ‘NDTV’शी बोलताना किच्चा सुदीप म्हणाला, “कोणत्याही प्रकारचं भांडण किंवा वाद व्हावा असा माझा हेतू अजिबात नव्हता. या सगळ्याच्या मागे कोणताही अजेंडा नव्हता. ते माझं मत होतं जे मी मांडलं. मी त्यावर आवाज उठवला. मला अभिमान वाटतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असं म्हणणं आहे. जो व्यक्ती आपल्या भाषेवर प्रेम करतो तिचा सन्मान करतो. त्या प्रत्येकाला मोदीजींचं म्हणणं ऐकल्यावर अभिमान वाटेल.”
सुदीप पुढे म्हणाला, “मी सर्व भाषांचा सन्मान करतो. मी फक्त कन्नड भाषेचं प्रतिनिधित्व करत नाही. मी इतर सर्व मातृभाषांबद्दल बोलत आहे. ज्यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त एक राजकारणी म्हणून पाहत नाही आपल्या सर्वांसाठी ते आपले नेता देखील आहेत.”