कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप आणि उपेंद्र राव यांचा ‘कब्जा’ चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. बरेच लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार होता, जो प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा ‘केजीएफ’ची आठवण करून देत होता. त्यामुळेच या चित्रपटाची एवढी हवा पाहायला मिळत होती.
मात्र, बॉक्स ऑफिसचे आकडे पाहता हा उत्साह थंडावलेला दिसतो. किच्चा सुदीप, उपेंद्र राव, शिव राजकुमार आणि श्रिया सरन स्टारर दिग्दर्शक आर चंद्रू यांच्या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी अतिशय संथ गतीने कमाई केली आहे. समोर आलेल्या मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दक्षिणेत चांगली कमाई केली असली तरी हे आकडे विशेष फारसे उत्साहवर्धक नाहीत.
आणखी वाचा : “याप्रकारच्या फॅशनचा मी…” उर्फी जावेदच्या कपड्यांबद्दल स्पष्टच बोलला रणबीर कपूर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवरून एकूण ११ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील किच्चा सुदीप आणि उपेंद्र राव सारखे बडे कलाकार असूनही या चित्रपटाची कामगिरी तशी निराशाजनकच मानली जात आहे. शिवाय हिंदी मार्केटमध्येसुद्धा या चित्रपटाची कामगिरी फारच कमी आहे, हिंदीमध्ये या चित्रपटाने पहिल्याच दिवशी फक्त ५० लाखांची कमाई केली आहे.
एकूणच या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बऱ्याच लोकांनी याला ‘केजीएफची स्वस्त कॉपी’ म्हणूनही हिणवलं होतं. या चित्रपटासाठी तब्बल १२० कोटी खर्च करण्यात आले आहेत, त्यामुळे हा चित्रपट सुपरहीट होणं हे याच्या निर्मात्यांसाठी गजरेचं आहे. ‘पुष्पा’, ‘केजीएफ’, ‘कांतारा’, ‘आरआरआर’सारख्या जबरदस्त चित्रपटांनंतर ‘कब्जा’ हा गेल्या काही वर्षातील पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे.