सलमान खानचा चित्रपट ईदच्या आसपास प्रदर्शित होणे आणि त्या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करणे हे ओघाने आलेच. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या त्याच्या चित्रपटाने सर्वात जलद गतीने १०० कोटींचा पल्ला गाठला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी येथेच थांबली नसून, प्रदर्शनापासून निव्वळ दहा दिवसांत या चित्रपटाने २०० कोटीचा आकडा पार केला आहे. सलमानच्या चित्रपटांमध्ये देशांतर्गत सर्वाधिक व्यवसाय करण्याचा मान या चित्रपटाला मिळाला आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १७८.२८ कोटींची धंदा केला, दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने ९.२२ कोटीची कामगिरी नोंदवली, शनिवारी १०.६२ तर रविवारी १४.१८ कोटीचा धंदा केला.
चित्रपट समिक्षक आणि चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीचे जाणकार तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या मिळकतीचे टि्वटस् पोस्ट केले आहेत.

 

या चित्रपटाने पाकिस्तानातसूद्धा २०.८ कोटीची मिळकत नोंदवत चांगली कामगिरी केली. हा चित्रपट २५ जुलै रोजी देशभरात ५००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, मोराक्को आणि मालदीवसह ४२ देशांमध्ये प्रदर्शित झाला. नाडियादवाला ग्रॅण्डसन्स एन्टरटेन्मेंन्टच्या बॅनरखाली निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची पटकथा नाडियादवाला आणि चेतन भगत यांनी लिहिली आहे. संमिश्र प्रतिक्रिया मिळत असताना देखील २०१४ सालचा प्रदर्शनाच्या दिवशीच जास्त धंदा करणारा चित्रपट ठरला आहे. ‘धूम ३’ चित्रपटाखालोखाल या चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील मिळकत नोंदवली गेली आहे.

Story img Loader