मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आपलं अपहरण करुन विनयभंग केल्याचा आरोप मल्याळम अभिनेत्री भावनाने केला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री भावना हिचे कोची येथे अपहरण करण्यात आले होते. भावना  शुक्रवारी रात्री तिच्या गाडीतून कोचीहून थ्रिसर येथे जात असताना टेम्पोमध्ये बसलेल्या काही व्यक्तिंनी तिचा पाठलाग केला. अथनी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सदर टेम्पोने भावनाच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर भांडणाच्या निमित्ताने या टोळीने गाडीचा ड्रायव्हर मार्टिन याला आत ढकलले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर अज्ञात व्यक्तिंनी भावनाचे अपहरण करून जवळपास दीड तास तिला गाडीत डांबून ठेवलं होतं. यावेळी त्यांनी तिचे काही फोटो आणि व्हिडिओदेखील काढले. त्यानंतर या टोळीने तिला पलरीवट्टम जंक्शन येथे सोडून तेथून पलायन केले. सदर घटनेनंतर भावनाने तिच्या घराजवळ राहत असलेल्या निर्मात्याचा घरी आसरा घेतला. सर्व प्रकार तिने निर्मात्याला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी ‘आयईमल्याळम’ संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, भावनाचा गाडी चालवणा-या चालकास अटक करण्यात आली आहे. सदर घटनेत त्याचा हात असल्याची शक्यता आहे. ही सर्व योजना दोन महिन्यांपूर्वीच आखण्यात आली होती. भावनाचा आधीचा ड्रायव्हर सुशील कुमार याने संपूर्ण योजना आखली होती. सुशीलच्या नावावर काही गुन्ह्यांची नोंद असल्याने भावनाने त्याला कामावरून काढले होते. त्यामुळेच सूडाच्या भावनेने त्याने हे कृत्य केले असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.  भावनाची संपूर्ण माहिती सुशीलला पुरवण्याचे काम मार्टिन करत होता. दरम्यान, शनिवारी भावनाचा सध्याचा ड्रायव्हर मार्टिन याला ताब्यात घेण्यात आले.

भावनाने २००२ साली ‘नम्मल’ या मल्याळम चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने मल्याळम, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा भाषांमध्ये जवळपास ७० पेक्षाही जास्त चित्रपट केले.