आशय-विषयदृष्टय़ा वैविध्यपूर्ण अशा मराठी चित्रपटांमध्ये चित्रचौकटींमधून बोलणारा आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नवा चित्रानुभव देणारा ‘किल्ला’ हा चित्रपट आहे. कोकणातल्या निसर्गाचे विलोभनीय दर्शन छायालेखक-दिग्दर्शकाने घडविले आहे. हा चित्रपट बच्चेकंपनीची करमणूक करण्यासाठी बनविलेला नाही. मात्र सर्व वयोगटांतील प्रेक्षक या चित्रपटातील गोष्टीशी आणि अनुभवाशी चांगलेच परिचित आहेत हे चित्रपट पाहताना नक्कीच जाणवेल. अल्प संवाद, छोटीशी गोष्ट परंतु, दृश्यप्रतिमांद्वारे प्रभावी पद्धतीने उलगडणारा ‘किल्ला’ हा चित्रपट प्रेक्षकाला नक्कीच खिळवून ठेवतो.
चित्रपटाची गोष्ट अगदी साधी आहे. किशोरवयीन चिन्मय काळेच्या विधवा आईची बदली होते. पुण्याहून तो आईसोबत कोकणातील एका गावात राहायला येतो. रुळलेल्या वातावरणातून अतिशय निराळ्या वातावरणात नवीन ठिकाणी येतो. सुरुवातीला त्याला चुकल्या-चुकल्यासारखे होते. नवीन ठिकाण, नवीन मित्र, नवी शाळा, नवं घर, अनोळखी वातावरण याच्याशी जुळवून घेणे सुरुवातीला चिन्मयला कठीण जाते. नवीन शाळूसोबतींशी ओळख झाल्यानंतर त्यांच्याशी मैत्र जुळवणे, शाळेतील तसेच गावातील वातावरणाशी जुळवून घेणे असे प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात, त्यातून तो मार्गही काढतो आणि हे नवीन जग त्याला आवडू लागते. कोकणातील समुद्रकिनारा, किल्ला, भोवतालचा निसर्गरम्य परिसराच्या पाश्र्वभूमीवर चित्रपट उलगडत जातो.
सरकारी नोकरीचे नवीन कार्यालय, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे, वडिलांविना चिन्मयला सांभाळणे यामुळे चिन्मयच्या आईला करावा लागणारा संघर्ष, मानसिक ओढाताण यामुळे चिन्मय आणि त्याच्या आईमध्ये दुरावा निर्माण होतो. चिन्मयच्या आईलाही नोकरीच्या ठिकाणी नवीन कार्यालयातील परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. त्यामुळे तिचाही संघर्ष आहे आणि चिन्मयचाही त्याच्या पातळीवर संघर्ष दिग्दर्शकाने अधोरेखित केला आहे.
चिन्मय काळेची बंडय़ा, युवराज, ओमकार, उमेश या नवीन शाळूसोबतींशी मैत्री होते. नवीन मित्रांशी गट्टी जमल्यावर चिन्मयचा नवख्या ठिकाणी वाटणारा एकटेपणा कमी होतो. परंतु, एकदा सायकलवरून गावाजवळच्या किल्ल्यावर गेल्यानंतर चिन्मयला त्याचे मित्र सोडून निघून जातात. अवाढव्य किल्ल्यावर आपण मुसळधार पावसात एकटेच आहोत हे जाणवल्यावर चिन्मय घाबरतो. यामुळे त्याचे मित्रांशी बिनसते. त्याचे मन:स्वास्थ्य बिघडते. त्यातून चिन्मय सावरतो, पुढे जातो.
चिन्मय, त्याची आई, चिन्मयचे मित्र अशा प्रमुख व्यक्तिरेखांच्या तोंडी अतिशय कमी संवाद आहेत. संपूर्ण चित्रपट अथांग समुद्र, किल्ल्याचा परिसर, वनराई, घर या सगळ्याच्या दृश्यप्रतिमांनी उलगडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. खूप ठिकाणी नि:शब्द, नीरव शांतता दाखविण्यातूनही चित्रपट उलगडतो. अतिशय प्रभावी छायालेखन हे चित्रपटाचे महत्त्वाचे बलस्थान ठरले आहे. लेखन-संगीत-दिग्दर्शन-छायालेखन अशा चित्रपट माध्यमाच्या सर्व महत्त्वाच्या घटकांचा उत्तम मेळ साधणारा हा चित्रपट आहे. सूक्ष्मरीत्या मानसिक आंदोलने दाखविण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.
चिन्मय काळेच्या भूमिकेतील अर्चित देवधर, चिन्मयच्या आईच्या भूमिकेतील अमृता सुभाष, बंडय़ाच्या भूमिकेतील पार्थ भालेराव, युवराजच्या भूमिकेतील गौरीश गावडे, ओमकारची व्यक्तिरेखा साकारणारा अथर्व उपासनी, उमेशच्या भूमिकेतील स्वानंद रायकर अशा सर्वानी अप्रतिम अभिनय केला आहे. कोकणातील निसर्गाचे विलोभनीय दर्शन छायालेखक-दिग्दर्शकाने घडविले आहे. बदललेल्या नवीन वातावरणात आल्यानंतर किशोरवयीन मुलांमध्ये येणारा एकटेपणा, वडील नसल्यामुळे समजूतदार वागणूक, मित्रांशी गट्टी जमल्यानंतर खुलणं हे सारं अर्चित देवधरने उत्तमरीत्या दाखविले आहे. गमतीजमती, खोडय़ा करणारा बंडय़ाच्या भूमिकेतील पार्थ भालेरावने धमाल अभिनय केला आहे. सर्वच बालकलाकारांनी चोख अभिनय केला आहे. सर्वच प्रमुख व्यक्तिरेखांसाठी केलेली कलावंत निवड आणि त्या निवडीला सार्थ ठरविणारा कलावंतांचा अभिनय हेही या चित्रपटाचे बलस्थान ठरते.

किल्ला
निर्माते – एम. आर. फिल्म्स, जार पिक्चर्स, एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक – छायालेखक –  अविनाश अरुण
कथा-पटकथा – तुषार परांजपे
संवाद – उपेंद्र सिधये
संगीत – नरेन चंदावरकर, बेनेडिक्ट टेलर
कलावंत – अमृता सुभाष, बालकलाकार अर्चित देवधर, बालकलाकार पार्थ भालेराव,  बालकलाकार गौरीश गावडे, बालकलाकार अथर्व उपासनी, स्वानंद रायकर, श्रीकांत यादव, सुहास शिरसाट, उमेश जगताप, शिवालती बोकील, जुई कहाते, देवेंद्र गायकवाड, बाळा कदम, मकरंद सप्तर्षी, रोमा देवधर, अंजली धारू व अन्य.

सुनील नांदगावकर – sunil.nandgaokar@expressindia.com

Story img Loader