बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतातील कुण्या तरुण अविनाश अरुण नामक दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट ‘किल्ला’ दाखवण्यात आला. अविनाशच्या लहानपणीच्या आठवणी, त्याचा जीवनानुभवाच्या मुशीतून जन्माला आलेली ती कथा त्याची भाषाही न कळणाऱ्या लहानग्यांनी बर्लिन महोत्सवात पाहिली. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रीय पुरस्कारासह मानाचे पुरस्कार मिळवणाऱ्या ‘किल्ला’ या आपल्या चित्रपटाला देशीविदेशी महोत्सवांमधून लौकिक मिळाला आहे. पण, शुक्रवारी हा चित्रपट इथे प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची पसंती मिळवणे ही ‘किल्ला’ची खरी कसोटी आहे, अशी भावना अविनाश अरुण यांनी व्यक्त केली.
फोटो गॅलरीः राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’
आईच्या नोकरीमुळे पुण्यासारख्या शहरातून गुहागरसारख्या ठिकाणी राहायला आलेला चिन्मय काळे, आजूबाजूचे बदललेले वातावरण, नवीन लोक यांच्याशी जुळवून घेताना झालेली चिन्मयच्या मनाची घालमेल आणि या नव्या प्रवासातील धडपडीदरम्यान त्याला गवसलेला स्वत:चा सूर ही ‘किल्ला’ची कथा आहे. पडद्यावर दिग्दर्शक अविनाशच्या मनातला हा ‘किल्ला’ पडद्यावर लढवणाऱ्या अर्चित देवधर, पार्थ भालेराव, स्वानंद रायकर, गौरीश गावडे, अथर्व उपासनी आणि चिन्मयच्या आईची भूमिका रंगवणारी अभिनेत्री अमृता सुभाष यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. ‘एमआर पिक्चर्स’, ‘जार पिक्चर्स’ आणि ‘एस्सेल व्हिजन’ यांची निर्मिती असलेला ‘किल्ला’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. एका चांगल्या चित्रपटाला ‘एस्सेल व्हिजन’सारख्या सशक्त निर्मात्यांचे बळ मिळते तेव्हा तो चित्रपट लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने नक्की पोहोचेल, असा एक विश्वास वाटत असतो. आता ‘किल्ला’ला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो आहे, याबद्दल उत्सुकता असल्याचे अभिनेत्री अमृता सुभाष आणि चिन्मयची भूमिका साकारणाऱ्या अर्चितने सांगितले.
तर ‘किल्ला’चा एकूणच प्रवास आपल्यासाठी फारच आगळा राहिला असल्याचे अविनाशने या वेळी बोलताना सांगितले. ‘माझ्याकडून अगदी अपघाताने हा चित्रपट घडला आहे. फिल्म इन्स्टिटय़ूटममध्ये शिकत असताना माझे बालपण जे काही वर्षे कोकणात गेले आहे त्याची क्षणचित्रे सारखी डोळ्यासमोर असायची. त्याचवेळी या आठवणींवर आधारित एक चित्रपट मला करायचा होता. कोकणात राहण्याचा जो अनुभव होता, पावसात भिजण्याचा, मासे पकडण्यापासून ते आजूबाजूला साप फिरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. माझ्यासारख्या शहरी भागातून आलेल्या मुलासाठी तो भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध करणारा अनुभव होता. आणि हा अनुभव कुठे तरी चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याची इच्छा मनात होती. फक्त ती एवढय़ा लवकर पूर्ण होईल असे वाटले नव्हते,’ असे अविनाशने सांगितले. हिंदी चित्रपटासाठी काम करताना ‘किल्ला’ची कथा सुचवण्याची संधी मिळाली तेव्हापासून ते बर्लिन चित्रपट महोत्सवात ‘किल्ला’ दाखवला गेला तेव्हा झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटापर्यंतचा प्रवास अविनाशने ओघवत्या गप्पांमध्ये सांगितला. अविनाश अरुण आणि ‘किल्ला’ टीमबरोबरच्या या गप्पा ‘रविवार वृत्तांत’मध्ये सविस्तर वाचता येतील.

Story img Loader