स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिकेतील अभिनेता किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने मांडलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकल्याने चर्चा रंगल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर आणि त्यासोबतच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, किरण माने यांनी ‘मला नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रुपये द्यावेत’ अशी मागणी केली आहे.

किरण माने यांच्यावर अनेक आरोप करुन त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत त्यांचे वकील असीम सरोदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर वक्तव्य केले. “मला अन्यायकारक आणि अपमानास्पद पद्धतीने काढून टाकणाऱ्या पॅनरोमा इंटरटेनमेंटच्या हुकुमशाही पद्धतीमुळे मला विनाकारण मनस्तापाताला सामोरे जावे लागले आहे. लोकांना भरकटवण्यासाठी महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप सांगत माझी नाहक बदनामी करण्यात आली. माझ्या करिअरचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. कौटुंबिक नुकसान झाले आहे. माझे वडील अत्यंत गंभीर आजारी पडले आहेत. माझी सामाजिक प्रतिमा ठरवून डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याची भरपाई म्हणून प्रोडक्शन हाऊस आणि संबंधीत महिलांनी माझी माफी मागावी. मला या सगळ्या नुकसानीची भरपाई म्हणून ५ कोटी रुपयांचे कॉम्पेनसेशन द्यावे अशी माझ्या वतिने माझे वकील यांनी नोटीस पाठवली आहे” असे किरण माने यांनी म्हटले.

पुढे किरण माने यांनी, “तसेच डिस्ने अमेरिका, डिस्ने इंडिया, स्टार इंडिया, स्टार प्रवाह यांच्याकडे माझी अशी मागणी आहे तुमचे मुलभूत नियम मोडल्याबद्दल, बेकायदेशीर कारवई केल्याबद्दल आणि खोटी माहिती देऊन तुमची दिशाभूल केल्याबद्दल पॅनरोमा इंटरटेन्टमेंट सोबत तुमचे असलेले सर्व करार रद्द करुन त्या कंपनीला बॅन करावे”, अशी मागणी केली आहे.

Story img Loader