Kiran Mane राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जनजागृती आणि शांतता रॅली काढत आहेत. राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांबाबत भूमिका मांडत आहेत. या रॅली आणि सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच दरम्यान मनोज जरांगे यांची पुण्यातही रॅली पार पडली. या रॅलीला पुण्यातल्या मराठा बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. पुणे शहर आणि जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील बांधव सहभागी झाले होते. याबाबत आता अभिनेते किरण मानेंनी (Kiran Mane) पोस्ट लिहिली आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला उत्तम प्रतिसाद
सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर फेरीला सुरुवात झाली. बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून फेरी जंगली महाराज रस्त्याने पुढे गेली. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर खंडूजी बाबा चौकात फेरीची सांगता झाली. या फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मनोज जरांगे यांच्या या शांतता रॅलीला पुण्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. याबाबत मनोज जरांगेंनीही पुण्यातल्या मराठा बांधवांचे आभार मानले. यानंतर आता याबाबत किरण मानेंनी (Kiran Mane) पोस्ट लिहिली आहे.
हे पण वाचा- Kiran Mane : अभिनेते किरण माने आयसीयूमध्ये दाखल, “आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..”; पोस्ट चर्चेत
काय आहे किरण मानेंची पोस्ट? ( What Kiran Mane Said? )
“आरक्षणामुळे पेटलेल्या वातावरणात ‘मराठा विरूद्ध मराठेतर समाज’ अशी स्पॉन्सर्ड आग लावायची ‘अनाजीपंती’ खेळी लै दिवस सुरूय. त्या कपटी वृत्तीला पुण्यातल्या समस्त बहुजनांनी सणसणीत थोबाडीत ठेवून दिली! “मराठा समाज कधीच कोणत्या जातीच्या विरोधात नव्हता आणि नसणार.” हे सतत ठासून सांगणार्या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत समस्त मराठेतर समाज बांधवांनी सहभाग दाखवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.. खर्या अर्थानं पुण्यानं महामानव महात्मा फुलेंचा वारसा सार्थ ठरवला.
मनूस्मृती आहे । पाखंडाची मुळी । गीर्वाणाचे तळी । विळपळे ।।
आईगाई खाती । वरी शुद्ध होती ।। शूद्रा लढविती । जोती दावी ।।
जय शिवराय… जय भीम ! अशी पोस्ट किरण मानेंनी केली.अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी याआधीही काही पोस्ट केल्या आहेत. ज्यांची चर्चा झाली. राहुल गांधींनी लोकसभेत विरोधी पक्षनेता झाल्यावर जे भाषण केलं त्याविषयी किरण मानेंनी मोदींना टोला लगावणारी पोस्ट केली होती. तसंच त्यांनी नीट परीक्षेतील गोंधळावरुनही पोस्ट लिहिली होती. आता किरण माने यांनी मनोज जरांगेंची बाजू घेत एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टवर अनेकांनी त्यांना उत्तरं दिली आहेत.