‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आलंय. राजकीय भूमिका घेत असल्याचं विचित्र कारण देत ही कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे. मात्र असं असतानाच आता खुद्द किरण माने यांनी फोनवर नक्की त्यांना काय सांगण्यात आलं. हा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भातील महत्वाचा खुलासा केलाय.
काल सायंकाळी फोन आल्यानंतर त्यावर नक्की काय सांगण्यात आलं आणि नक्की काय घडलं असा प्रश्न किरण मानेंना विचारण्यात आला. “मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. खूप छान टीआरपी त्याला आहे. विलास पाटीलचं पात्रही लोकांमध्ये फार लोकप्रिय झालं आहे. पण काल शुटींग संपल्यानंतर मला प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला. हिंदी प्रोडक्शन हाऊस आहे सुझाना घाई त्याच्या निर्मात्या आहेत. प्रोडक्शन हेड रजत नायर यांचा मला फोन आला. तुम्हाला रिप्लेस केलंय. विलास पाटील ही भूमिका साकारणारा कलाकार रिप्लेस करतोय. काहीजण तुमच्यावर नाराज आहेत, असं सांगून त्यांनी फोन ठेवला,” असं किरण मानेंनी सांगितलं.
पुढे बोलताना किरण माने म्हणाले, “या फोननंतर मी चॅनेलला फोन केला. सतीश राजवाडे चॅनेलचे हेड आहेत. त्यांनी फोन उचलला नाही. मग मी चॅनेलमधील माझ्या एका मित्राला फोन केला. त्याला मी विचारलं की कारण काय आहे हे सांगशील का?” किरण माने यांनी विचारलेल्या या प्रश्नावर त्यांच्या मित्राने किरण यांना मालिकेतून काढून टाकणार असल्याचं कळल्याचं सांगितलं. “एका महिलेने तक्रार केली की तुम्ही राजकीय पोस्ट करता,” असं या मित्राने सांगितल्याचं किरण माने म्हणाले.
नक्की वाचा >> “मला म्हणतात की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात, पण…”; मालिकेमधून काढल्यानंतर किरण मानेंची रोकठोक प्रतिक्रिया
“मला धक्काच बसला की राजकीय पोस्टचा आणि या कामाचा काय संबंध आहे? मी राजकीय भूमिका घेण्यापेक्षा विचारधारेची भूमिका घेतोय. मी विशिष्ट राजकीय पक्षावर लिहित नाही. मी पुरोगामी विचारसणीचा आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा मानणारा आहे,” असं आपली भूमिका स्पष्ट करताना माने यांनी सांगितलं. “मी एक किरण माने म्हणेल की जा मला नाही फरक पडत. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांचं पोट त्याच्यावर आहे. ते लोक घाबरतात,” असं किरण माने म्हणाले.
तसेच पुढे बोलताना, “मला चॅनेलवर पण आक्षेप नाही. त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणलाय. या दबावावार पण उत्तर देऊयात जेणेकरुन या सगळ्याचा पुन्हा विचार केला जाईल,” अशी आशा किरण मानेंनी व्यक्त केलीय.