‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढल्याचा आरोप केला. यानंतर त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. दरम्यान, किरण माने यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येत भूमिका मांडली. माऊच्या आजीची म्हणजे विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही याबाबत सडेतोड भूमिका मांडली होती. त्यापाठोपाठ किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सविता मालपेकर यांना उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने यांनी फेसबुकवर सविता यांच्यासोबत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “मी लाडानं तुला ‘म्हातारे’ अशी हाक मारायचो… अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते… “किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय.” असं तुला वाटायला लागलं… तू मेकअपरुमध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस… तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते.. तुला काही फॅक्टस् सांगीतल्यावत्या… नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती…प्राॅडक्शन हाऊसमधुन लेखकांना सांगीतलं गेलंवतं की सविताताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीसबी.. आपण हसलो… आणि मग पुन्हा आपलं “म्हातारेS-इलासाS ” सुरू झालं…”, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर…”, किरण मानेंसाठी अभिनेत्री अनिता दातेने लिहिली पोस्ट

पुढे ते पोस्टमध्ये म्हणाले, ‘परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं…पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं… कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा.. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं??? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं???? त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवलावता…असो. त्यांची तुझ्यावर कृपा राहो. माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही ! झगडणार… लढणार…तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासाचा इस्वास हाय… जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन.. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन.सातारी कंदी पेढे आणून देईन.. पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं! तुझ्यावर राग नाय गं माझा.’

काय म्हणाल्या होत्या सविता मालपेकर?
माझ्याबरोबर त्याने असे काहीही केलेले नाही. बाकीच्या सहकलाकारांना सतत टोमणे मारणे, माझ्यामुळे सिरिअल सुरु आहे. मी हिरो आहे सिरीअलचा, मी हिला काढेन, मी त्याला काढेन ही भाषा कशासाठी. तू जरी हिरो असला तरी ते सिद्ध करावे. त्यांनी जी भूमिका मांडली ती चुकीची आहे. ती अयोग्य आहे. राजकारण आणि चॅनलचा काहीही संबंध नाही.

नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असायचे. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते होती.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.