समाजहितासाठी कार्य करणाऱ्या काही कलाकारांच्या यादीत अभिनेता आमिर खानचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. आमिरने जलसंवर्धनासाठी पुढे सरसावत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियान सुरु केले होते. या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एक म्युझिक व्हिडिओ प्रसारित करणार असल्याची घोषणा केली आहे. किरण गाणार असलेल्या या गाण्याबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनहितार्थ प्रसारित करण्यात येणाऱ्या या गीताला अजय-अतुल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केले असून स्वत: किरण राव हे गीत गायले आहे. गुरु ठाकूरने हे गाणे लिहिले आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये ‘सैराट’ या चित्रपटाद्वारे गाजलेली जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नागराज मंजुळेने या व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आमिरसाठीच ही ‘सैराट’ टीम एकत्र आली आहे असे म्हणावे लागेल. गेल्या वर्षापासूनच आमिर आणि त्याची पत्नी किरण, महाराष्ट्र राज्य जलयुक्त शिबिराच्या निमित्ताने कार्यरत आहेत. या अभियानाअंतर्गत पाण्याच्या आणि अवर्षणाच्या अभावी दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पाण्याचा साठा आणि त्याचा योग्य तो वापर कसा करण्यात यावा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या उपक्रमांअंतर्गत जनसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी अनोखी शक्कल लढवत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.

वाचा: जाणून घ्या, रिंकू राजगुरु सध्या करतेय तरी काय?

२०१७ हे वर्ष या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून यात राज्यातील ३० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या या व्हिडिओबद्दल सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या निमित्ताने आमिरच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने पहिल्यांदाच मराठीत गाणे गायले आहे, त्यामुळे आता किरणचा हा मराठी अंदाज नेमका असणार तरी कसा हो पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, आमिर सध्या चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे. कुस्तीपटू महवीर सिंग फोगट यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले असून या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली आहे. काही दिवसांपूर्वीच आमिरने ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने सुरु असणाऱ्या काही व्यग्र कामांमधून वेळ काढत किरण आणि काही मित्रमंडळींसोबत पाचगणीच्या त्याच्या फार्महाऊसवर लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran rao going to sing in marathi for aamir khan campaign