मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार कामानिमित्त किंवा कुटुंबासाठी मुंबई-पुणे असा दैनंदिन प्रवास करतात. बरेच कलाकार मूळचे पुण्याचे असून केवळ कामासाठी मुंबईला स्थायिक झाले आहेत. या कलाकारांना मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना वाहतूक कोंडी, जास्तीचा टोल असे अनेक अनुभव येतात. मध्यंतरी लोणावळ्यात शिरून पुन्हा एक्सप्रेस हायवेला लागल्यावर दुप्पट टोल आकारण्यात आल्याचं अभिनेत्री ऋजुता देशमुखने निदर्शनास आणून दिलं होतं.
ऋजुताने व्हिडीओच्या माध्यमातून या गोष्टीला वाचा फोडली होती. आता तिच्यापाठोपाठ कवी, लेखक आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांनीदेखील या विषयावर भाष्य केलं आहे. ऋजुतासारखाच अनुभव त्यांनाही आल्याने त्यांनी याबद्दल एक चांगलीच खरमरीत अशी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. ही लूट थांबायला हवी अशी त्यांनी तक्रार आपल्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
आणखी वाचा : कमर्शियल चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले “रामायण व महाभारत…”
aआपल्या फेसबुक पोस्टमध्ये सौमित्र लिहितात, “मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर २४० टोल घेतात .. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही .. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?”
किशोर कदम यांच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट करत त्यांनाही असाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे. किशोर कदम यांनी थेट या कारभाराविषयी सरकारलाच जाब विचारला असल्याने काही लोक त्यांच्या या पोस्टकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत व त्यांना ट्रोल करत आहेत, पण एक्सप्रेस हायवेवरील या दुप्पट आकारल्या जाणाऱ्या टोलबद्दल बरेच लोक त्रस्त आहेत हे स्पष्ट झालं आहे.