हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने आणि त्यांच्या हस्ते मिळणारा हा पुरस्कार अनेक पुरस्कारांपेक्षा महत्त्वाचा असून तो एका सुराने दुसऱ्या सुराला दिलेला प्रतिसाद आहे. हरिप्रसादांच्या कंठातून निघणारे सूर बासरीतून निनादत असतात आणि गायकांची त्यांना साथ लाभत असते, असे प्रतिपादन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केले. ठाणे येथे गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘पं. हरिप्रसाद चौरसिया’ पुरस्कार यंदा किशोरी आमोणकर यांना दस्तुरखुद्द पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी त्या बोलत होत्या.
ठाण्यातील श्रीसमर्थ मंडळ हायस्कूलच्या मैदानावर रविवारी गुरुकुल प्रतिष्ठानचा सातवा बासरी उत्सव रंगला होता. रविवारी रंगलेल्या कार्यक्रमामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी हेमवती रागातील रुपम या रचनेवरील वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर पंडितजींच्या हस्ते किशोरी आमोणकर यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना हरिप्रसाद चौरसिया यांच्या बद्दलच्या आपल्या भावना किशोरी आमोणकरांनी व्यक्त केल्या. दोन कलाकारांच्या गायन आणि वादनाच्या जुगलबंदीला दोघांमधील भांडण असा समज रसिक करून घेत असतात. मात्र ती जुगलबंदी म्हणजे भांडण नसते. पं. हरिप्रसादांवर साक्षात श्रीकृष्णच प्रसन्न असून त्यांची ही साधना अशीच अविरत सुरू राहो, अशा शुभेच्छा आमोणकर यांनी दिल्या. कार्यक्रमात वादक त्रिलोक गुर्टू यांनी ड्रमच्या वादनाबरोबरच बासरीवरही ताल धरल्याने रसिक अचंबित झाले होते, तर संगीत हळदीपूर यांनी की-बोर्डच्या साथीने रसिकांनाही गाते केले. रवी चारी, तबलावादक विजय घाटे आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे विवेक सोनार यांनी या वेळी आपली कला सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा