नव्या पुस्तकांचा सुगंध घेत, पाने उलटत, मुखपृष्ठ न्याहाळत, मलपृष्ठावरील सारांश वाचून मगच पुस्तक  निवडण्याचा अनुभव ऑनलाइन खरेदीमध्ये मिळत नाही. त्यामुळे खऱ्या वाचकाला प्रत्यक्ष दुकानातील पुस्तक खरेदीचाच आस्वाद घ्यायचा असतो. अशा खऱ्या वाचकांसाठीच दहा वर्षांपूर्वी ‘किताबखाना’ची निर्मिती करण्यात आली. सलग नऊ वर्षे वाचकांना साहित्य सहवास देणाऱ्या किताबखानाचे दहावे वर्ष मात्र टाळेबंदीत गेले. टाळेबंदीनंतर पुन्हा वाचकांची पावले ‘किताबखाना’कडे वळतात तोच येथे आग लागली आणि ‘किताबखाना’ पुन्हा बंद करावा लागला. आता दशकपूर्ती होता-होता ‘किताबखाना’ नव्या जोमाने पुन्हा सुरू होत आहे. गेल्या १० वर्षांत मुंबईच्या साहित्यविश्वाची ओळख बनलेल्या किताबखानाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या

अम्रिता सोमय्या किताबखानाच्या या नव्या वाटचालीबाबत आशावादी आहेत.

*  आधी टाळेबंदी आणि नंतर आग या दोन्ही मोठय़ा संकटांवर मात करून किताबखाना पुन्हा सुरू होत आहे, हे कसे साध्य केले ?

टाळेबंदी सुरू झाली तेव्हा सर्वच क्षेत्रांतील अर्थचक्र ठप्प झाले होते. किताबखानाचेही तसेच झाले; मात्र वाचकांशी असलेले नाते टिकवून ठेवण्यासाठी समाजमाध्यमांवर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल होताना किताबखानाही सुरू झाला.  सुरुवातीला आठवडय़ातील पाच दिवस व नंतर संपूर्ण आठवडाभर असे टप्प्याटप्प्याने किताबखाना सुरू झाला. आम्ही समाजमाध्यमांवर पुस्तकांच्या जाहिराती करतच होतो. वाचक आपल्या आवडत्या पुस्तकांची मागणीही नोंदवत होते. प्रत्यक्ष दुकानात येणाऱ्या वाचकांची संख्या सुरुवातीला कमी होती; पण हळूहळू ती संख्या वाढू लागली आणि अशातच ९ डिसेंबरला किताबखानाच्या उपाहारगृहात आग लागली. उपाहारगृहातून पोटमजल्यावर आग पसरत गेली. आग, धूर आणि अग्निशमन दलाने मारलेले पाणी यांमुळे हजारो पुस्तकांचे नुकसान झाले. सर्व काही सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना घडलेली ही घटना म्हणजे मी, माझे पती समीर सोमय्या आणि किताबखानाचे कर्मचारी आम्हा सर्वासाठीच खूप मोठा धक्का होता; पण आम्ही वाचकांशी वचनबद्ध आहोत. त्यामुळे दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. महिना-दीड महिना नुकसानीची चाचपणी करण्यात गेला. विमा कंपनीच्या पाहणीनंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. किताबखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे आर्थिक पाठबळ समीर यांच्याकडे आहे. शिवाय विम्याची रक्कम मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. किताबखानामध्ये पूर्वी जलतुषार प्रणाली (स्प्रिंकलर) नव्हती, कारण चुकून जरी ही प्रणाली सुरू झाली तर पुस्तकांचे नुकसान होऊ शकले असते. पण पुन्हा आगीची घटना घडल्यास खबरदारी म्हणून आता उपाहारगृहाच्या भागात जलतुषार प्रणाली बसवण्यात येणार आहे.

*  टाळेबंदीनंतर ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. जीवनावश्यक गोष्टींना ग्राहक प्राधान्य देत आहेत. अशा वेळी किताबखानाचा प्रतिसाद कमी झाला तर..

किताबखाना बंद झाल्या दिवसापासून वाचक सतत विचारणा करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, ईमेलद्वारे आणि पत्राद्वारे संदेश पाठवत आहेत. सिंगापूरच्या एका वाचकाने तर त्यांना हवे असलेले पुस्तक ते तेव्हाच खरेदी करतील जेव्हा किताबखाना सुरू होईल, असे सांगून ठेवले होते. शेवटी पुस्तकांच्या सहवासात निवांतपणे वेळ घालवण्याचा आनंद वेगळा असतो. टाळेबंदीतला बराच काळ घरात बसून राहावे लागल्याने आता लोक बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधत आहेत. घरातून कार्यालयीन कामे करताना संगणकासोबत बराच वेळ लोकांनी घालवला आहे. आता त्यापासून सुटका हवी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता पुस्तकप्रेमींच्या प्रतिसादाबद्दल किताबखाना आशावादी आहे.

* टाळेबंदीनंतरची इतर आव्हाने काय आहेत?

करोना जाण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी तरी जाईल. त्यानंतर काय आव्हाने असतील याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही; पण एवढे नक्की सांगते की प्रत्येक आव्हान म्हणजे एक संधी असते.

*  किताबखानाने कधी ऑनलाइन खरेदीचा पर्याय वाचकांना दिला नाही, असे का? टाळेबंदीत तरी ऑनलाइन सेवेची कमतरता जाणवली का?

किताबखानामध्ये दूरध्वनी करून पुस्तके  मागवता येतात; पण पुस्तकांनी वाचकांना दुकानात ओढून आणावे. वाचकांनी पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवावा, हाच किताबखानाचा मूळ हेतू आहे. संके तस्थळावर एक क्लिक करून वाचकांनी पुस्तक मागवले आणि ते त्यांना घरपोच मिळाले तर किताबखानाच्या मूळ उद्देशालाच तडा जाईल. त्यामुळे अशा प्रकारची सेवा पूर्वी कधी दिली नाही. टाळेबंदीपासून मात्र आम्ही समाजमाध्यमांवरून वाचकांनी नोंदवलेली मागणी स्वीकारत आहोत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संकेतस्थळ असायला हवे होते. खरे तर ऑनलाइनमध्ये नेमका किती व्यवसाय होतो याची मला कल्पना नाही.

*  किताबखाना सुरू करण्यामागे कोणती प्रेरणा आहे? काय उद्देश आहे?

माझ्यापेक्षा समीर यांना वाचनाची भरपूर आवड आहे. हिंदी, उर्दू, गुजराती आणि विविध प्रकारचा आशय असलेली अनेक पुस्तके  ते एका वेळी वाचू शकतात. २००४-०५ साली ते हार्वर्डमध्ये शिकत असताना तेथे आम्ही पुस्तकांची अनेक दुकाने पाहिली. ती त्या शहरांची ओळख आहे. दुकान चालवणारे एक-दोन कर्मचारी असतील तरीही त्यांना आपल्या दुकानातील पुस्तकांची इत्थंभूत माहिती असते. मलाही १५-१६ वर्षांची असल्यापासून पर्यटनविषयक पुस्तकांचे दुकान सुरू करण्याची इच्छा होती. त्यामुळे पुस्तकांच्या जगात हरवून जाता येईल अशी एखादी जागा मुंबईत निर्माण करण्याचे ठरवले आणि किताबखानाची निर्मिती झाली.

*  पुस्तकांची निवड कशी केली जाते?

दरवर्षी आम्ही लंडन येथील वार्षिक पुस्तक प्रदर्शनाला भेट देतो. तेथे जगभरातील प्रकाशकांची पुस्तके  असतात. त्यातून वैविध्यपूर्ण आशय असलेली पुस्तके  निवडली जातात. केवळ विरंगुळा नाही तर, जी पुस्तके काही तरी मूल्यसंस्कार देतील, वाचकांना विचारप्रवृत्त करतील अशा पुस्तकांना प्राधान्य दिले जाते. किताबखानामध्ये येणाऱ्या वाचकांशी चर्चा करून त्यांची आवडनिवड जाणून घेतली जाते. वाचकांनी ठरावीक एका पुस्तकाची मागणी केल्यास जेव्हा ते पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा त्यांना कळवले जाते.

* येथे प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकेच का ठेवली जातात? भारतीय भाषांतील साहित्याला एवढी मोठी हक्काची जागा कधी मिळेल ?

आम्हाला माहीत असलेली भारतीय भाषांतील पुस्तके  बरीचशी काल्पनिक विषयांवर आधारित असतात. चालू घडामोडींवर आधारित पुस्तके भारतीय भाषांमध्ये असूही शकतात; पण आमच्या पाहण्यात तशी पुस्तके  फारशी कधी आली नाहीत. भारतीय भाषांतील साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत पुस्तके  किताबखानामध्ये ठेवतो. या पुस्तकांना प्रतिसादही चांगला मिळतो; पण येथे इंग्रजी वाचणारे वाचक अधिक येतात, असा अनुभव आहे. वाचकांनी मागणी केल्यास भारतीय भाषांतील साहित्याचे प्रमाणही वाढवले जाईल.

*  पुस्तकांची दुकाने बंद पडण्याचा काळ सुरू आहे. तरुण वाचकांचा कल ई-बुक्स आणि श्राव्य पुस्तकांकडे वाढतो आहे. बालवाचकांनाही तंत्रज्ञानाची ओढ लागली आहे. याचे पडसाद किताबखानावर उमटलेले जाणवतात का?

तसा परिणाम दिसेल अशी शंका कधी कधी वाटते; पण तसे काही होईल असे वाटत नाही. ई-बुकचा पर्याय कायम दुसऱ्या स्थानावर असतो. एखाद्या माणसाशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधणे आणि त्याला प्रत्यक्ष भेटणे यांत फरक असतोच. तसेच ई-बुक वाचणे आणि पुस्तकाच्या छापील प्रतीचा सुवास घेणे, त्याला स्पर्श करणे हा आनंद वेगळा असतो. आजकाल मुले पूर्ण दिवस आभासी जगाशी जोडलेली असतात. अशा वेळी त्यांनी पुस्तकांच्या जगात वावरावे असे पालकांनाही वाटते. माझ्या मुलांच्या शाळेतही पुस्तके वाचण्याला प्रोत्साहन दिले जाते. किताबखाना सुरू झाला तेव्हा माझी मुलगी १० वर्षांची होती. दुकानातील एकेक पुस्तक कपाटात लावण्यासाठी तिने आम्हाला मदत केली. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ती दुकानातच असायची, एवढी तिला पुस्तकांची आवड आहे. पुस्तकांच्या दुकानांनी वाचकांना आकर्षित करण्यासाठी सतत सर्जनशील राहिले पाहिजे. आम्ही अनेकदा पुस्तक प्रकाशन, कवितावाचन, लहान मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करतो. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत.

*  मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये पुस्तकांची दुकाने सहज उपलब्ध होतात. पण इतर ठिकाणी काय स्थिती आहे?

समीर यांचे कच्छमधील गाव ‘तेरा’ येथे आम्ही एक छोटे ग्रंथालय सुरू केले आहे. ते गाव गरीब आहे असे नाही; पण तेथील शाळेत ग्रंथालय नाही. त्यामुळे आम्ही एका जुन्या घरामध्ये ग्रंथालय सुरू केले आहे. तेथे एका ग्रंथपालाची नियुक्तीही केली आहे. कच्छ येथील ‘रोहा’ येथेही ग्रंथालयाची इमारत उभी राहते आहे. महाराष्ट्रातील कोपरगाव येथे आमच्या संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘शारदा इंग्लिश स्कूल’च्या ग्रंथालयाच्या इमारतीला वास्तुस्थापत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

*  किताबखानाच्या शाखा उघडण्याचा विचार आहे का?

सध्या तसा काही विचार नाही. किताबखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यावरच लक्ष केंद्रित करणार आहे.

*  इथून पुढे किताबखानाची वाटचाल कशी असेल?

ते आता वाचकांच्या हाती आहे.

मुलाखत – नमिता धुरी

Story img Loader