गेले काही महिने ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा सगळेच प्रेक्षक या चित्रपटासाठी फार उत्सुक होते. मात्र या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी या चित्रपटाला विरोध करायला सुरुवात केली. या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. आता त्या ट्रोलर्सना अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
या चित्रपटातील काही दृश्य, व्हीएफएक्स आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाला लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. बजेटच्या मुद्द्यावरुनही चित्रपटावर टीका होऊ लागली. चित्रपटातील व्हीएफएक्ससह वेशभूषा, कास्टिंग अशा गोष्टींवरुन प्रेक्षक ओम राऊतवरही प्रेक्षकांनी निशाणा साधला. परिणामी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ६ महिन्यांनी पुढे ढकलण्यात आता आहे. आता या चित्रपटात अनेक बदल केले जाणार आहेत. अभिनेत्री सीतेची भूमिका साकारणाऱ्या क्रिती सेनॉनने याबद्दल भाष्य केलं आहे.
नुकत्याच एका वृत्त वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “हा एक भव्य चित्रपट आहे, ज्यातून इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना मांडल्या जाणार आहेत. आम्हा सर्व कलाकारांना या चित्रपटात काम करायला मिळणं ही एक अभिमानाची गोष्ट वाटते. आमचे दिग्दर्शक ओम राऊत यांना हा चित्रपट उत्कृष्टप्रकारे पडद्यावर आणायचा आहे.”
चित्रपटाचा फक्त टीझर पाहून या चित्रपटावर टीका करणाऱ्यांनाही क्रितीने खडे बोल सुनावले आहेत. ती म्हणाली, “आता या चित्रपटाचा फक्त टीझर समोर आला आहे. ३५ सेकंदांच्या टीझरमध्ये सगळं काही दाखवू शकत नाही. या चित्रपटात अजून भरपूर काही बघण्यासारखं आहे. या चित्रपटावर दिग्दर्शक ओम राऊत यांना थोडं काम करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना थोड्या वेळाची आवश्यकता आहे. आम्ही सर्वजण याकडे एक संधी म्हणून बघत आहोत. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला आपला इतिहास, आपला धर्म जागतिक स्तरावर न्यायचा आहे. ओम राऊत यांनी त्यांचा सगळा वेळ या चित्रपटाला दिला आहे, जेणेकरून ते हा चित्रपट उत्तमप्रकारे प्रेक्षकांसमोर आणू शकतील. या चित्रपटात बघण्यासारखं भरपूर आहे. ‘आदिपुरुष’मधून आपला इतिहास नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.”
हेही वाचा : “पौराणिक व्यक्तिरेखांचा त्यांना…”; क्रिती सेनॉनचे ओम राऊतबद्दल मोठे वक्तव्य
‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांचे पात्र प्रभास साकारणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनॉन, सनी सिंह हे कलाकार दिसणार आहे. ‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये भगवान हनुमान यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आता हा चित्रपट १६ जुन २०२३ रोजी प्रदर्शित होईल.