बॉलिवूड प्लेबॅक सिंगर ‘केके’च्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कोलकाता येथील एका कॉन्सर्टदरम्यान कार्डिएक अरेस्टमुळे केकेचं निधन झालं. केकेच्या निधनानंतर सोशल मीडियावरून त्याच्या टीमवर टीकेची झोड उठवण्यात आली. केकेच्या टीमने त्याच्या तब्येतीची योग्य काळजी न घेतल्यानं असं घडल्याचं म्हटलं गेलं होतं. जर केकेला वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित तो वाचला असता असं देखील बोललं गेलं. केकेची संपूर्ण टीम आणि त्याचे मॅनेजर हितेश भट आणि शुभम भट यांच्या विरोधात सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता केकेची मुलगी तामरानं याबाबत एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.
केकेची मुलगी तामराने तिच्या इन्स्टाग्रामवर केकेचा त्याच्या टीमसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तामरानं एक लांबलचक पोस्ट देखील शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तामरानं केकेच्या टीमच्या विरोधात तिरस्कार आणि नकारात्मकता पसरवणं बंद करा आणि त्यांना सपोर्ट करा असं भावनिक आवाहन देखील केलं आहे. याची सगळ्यांनाच गरज असल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
आणखी वाचा- आलियाशी लग्न करण्याआधीच विवाहित आहे रणबीर? पहिल्या पत्नीबाबत केला खुलासा
तामरानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “मी या फोटोमधील प्रत्येक व्यक्तीची आभारी आहे कारण यातली प्रत्येक व्यक्ती माझ्या बाबांसोबत कायम होती. माझ्या बाबांचे शो चांगले आणि प्रत्येकाच्या आठवणीत राहतील असे होण्यासाठी यांनी मेहनत घेतली. मी हितेशला सांगितलं की, जेव्हा बाबा गेले तेव्हा मी, आई किंवा नकुल कोणीच त्यांच्यासोबत नव्हतो. त्यांना आणि अखेरचं गुड बाय देखील म्हणू शकलो नाही. पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही नेहमीच त्यांच्या सोबत होता. जेव्हा बाबांनी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांना साथ दिली.”
आणखी वाचा- कौतुकास्पद! प्रसिद्ध अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, व्हिडीओ चर्चेत
केकेची मुलगी तामरानं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “बाबांचं त्यांच्या टीमधील लोकांवर खूप प्रेम होतं त्यांच्यावर त्यांचा खूप विश्वास असणार. मी ऐकलंय की हितेश आणि शुभम यांच्यावर बरीच टीका करण्यात आली. त्यांना धमक्यांचे फोन आहे, इमेल्स आले. जर आज बाबा असते तर त्यांना कसं वाटलं असतं. तुम्ही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहेत. कृपया त्यांच्या टीमच्या विरोधात अशाप्रकारे नकारात्मकता परसवू नका.”