बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केकेचं काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्याच्या निधनानंतर मागच्या काही दिवसांमध्ये बरेच धक्कादायक खुलासे झाले आहेत. हार्ट फेल झाल्यानं केकेचं निधन झाल्याचं जरी शवविच्छेदन अहवालात समोर आलं असलं तरी हे थांबवता आलं असतं आणि कदाचित केके वाचला असता असं देखील म्हटलं जातंय. ज्या दिवशी केकेचं निधन झालं त्या दिवशी परफॉर्म करताना त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्याचं निधन झाल्याचा खुलासा एका गायिकेनं केला आहे. ही गायिका केकेसोबत या शोमध्ये परफॉर्म करत होती.
गायिका शुभलक्ष्मी डे ने त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं. त्यावेळी शुभलक्ष्मी त्या ठिकाणी उपस्थित होती. आजूबाजूला एवढी जास्त गर्दी पाहिल्यानंतर केके फार अस्वस्थ झाला होता आणि तो कारमधून बाहेर पडण्यासही नकार देत होता. असं असतानाही त्याने जवळपास १ तास परफॉर्म केलं. पण त्यानंतर त्याची तब्येत जास्तच बिघडली. असं नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत शुभलक्ष्मीनं सांगितलं. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शुभलक्ष्मी म्हणाली, “त्यावेळी ऑडिटोरियमच्या बाहेर खूप गर्दी होती. केके संध्याकाळी ५ वाजता आला होता. स्टेजवर आल्यानंतर त्यानं सर्वात आधी तिथल्या लाइट्स मंद करण्यास सांगितलं. जर त्याने त्यावेळी तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं असतं तर कदाचित आम्ही शो रद्द केला असता.”
केकेच्या निधनानंतर केवळ संगीत क्षेत्रच नाही तर संपूर्ण बॉलिवूड आणि देशभरातील लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. केकेच्या निधनानंतर पश्चिम बंगाल सरकारनं त्याला राजकीय सन्मान दिला. केकेला त्या शो दरम्यान अस्वस्थ वाटत होतं. मात्र आता यावर अधिक तपास केला जात आहे. केकेचा शवविच्छेदन अहवाल आला असून त्यानुसार त्याचा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या होती असं स्पष्ट झालं आहे.