लेखकाने लिहून दिलेली वाक्यं बोलून पात्र साकारणं हे कलाकाराचं काम. पण अभिनय करतानाच शब्दांची वीण गुंफून कविता रचणारी अभिनेत्री दुर्मीळच. त्यापैकी एक आहे कवयित्री आणि अभिनेत्री स्पृहा जोशी. आज तिचा वाढदिवस. भाषेवर प्रेम करणारी, चांगलं वाचणारी आणि कवितांना मुख्य प्रवाहात आणणारी कवयित्री ही अभिनेत्री स्पृहाची दुसरी ओळख. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्रीमधल्या कवयित्रीचा घेतलेला शोध.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अशी’ झाली कविता लिहिण्याची सुरुवात –
स्पृहा ही मूळची मुंबईची. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. टिपिकल दादरकर. तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर या शाळेत झालं आणि तिथेच तिला तिच्यातील अभिनय, लेखन, वक्तृत्व हे सूप्तगुण गवसले. याचं सगळं श्रेय तिच्या शाळेतील शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांना जातं असं तिने आतापर्यंत अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे. स्पृहा दुसरीत होती तेव्हा तिने तिचं पहिलं बालनाट्य केलं होतं ज्याचं नाव होतं ‘दिनूचं बिल.’ हे नाटक विद्याताई पटवर्धन यांनी बसवलं होतं आणि त्यात त्यांनी स्पृहाला प्रमुख भूमिका दिली होती. इयत्ता सहावी-सातवीत असताना तिने ‘दे धमाल’ या मालिकेतही काम केलं. पण कविता करण्याची तिची सुरुवात झाली ती इयत्ता नववीत असताना. स्पृहाला नववीत असताना (२००३ साली) सृजनात्मक लेखनासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते बालश्री पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय स्तरावरचा हा पुरस्कार होता आणि त्या स्पर्धेला स्पृहाचं नाव नोंदवलं होतं ते विद्याताई पटवर्धन यांनी. या स्पर्धेच्या निमित्ताने तिने तिच्या आयुष्यातली पहिलीवहिली कविता केली. ‘दुर्दशा आमची’ असं त्या कवितेचं शीर्षक होतं. त्यावेळी तिला जाणवलं की आपल्याला कविताही करता येतात.

दिग्गजांकडून मार्गदर्शन –
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा प्रत्येजण कविता करू लागतं आणि आपलं काव्य हे जगातलं बेस्ट काव्य आहे असं आपल्याला वाटतं. असा एक काळ तिच्याही आयुष्यात आला. त्या दिवसांमध्ये तिने भरपूर कविता लिहिल्या. त्यावेळी तिला घरच्यांबरोबरच काही दिग्गज कवींकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. त्या टप्प्यावर तिला अशी काही माणसं भेटली ज्यांनी तिला सांगितलं की, “आता थोडा काळ लिहिणं थांबव आणि वाचायला सुरुवात कर. जर तुला कविता आवडत आहेत तर तू कवितांची खूप पुस्तकं वाच.” तिला हे सांगणारे तिचे आई -बाबा होते, काही शिक्षक होते, काही शंकर वैद्य,डॉ. अरुणा ढेरे यांच्यासारखे दिग्गज कवी होते. या सगळ्यांनी तिला सांगितलं की “आता लिहिणं थांबव, ही वाचायची वेळ आहे.” त्यांचं बोलणं ऐकून तिने त्या काळात भरपूर पुस्तकं वाचली. त्यातून तिला वेगवेगळे शब्द, भाव सापडले. बालभरातीच्या पुस्तकातील कविता ज्या तिला फारशा आवडायच्या नाहीत किंवा ज्या कविता तिच्यासाठी शाळेत असताना फक्त संदर्भासाहित स्पष्टीकरणापुरत्याच मर्यादित होत्या त्या आवडू लागल्या आणि परीक्षेतील मराठीचा पेपर हा सगळ्यात आवडीचा पेपर झाला. यामुळे तिला तिचे विचार उत्तमरीत्या शब्दांत उतरवता येऊ लागले.

पहिला कवितासंग्रह आणि कविवर्य मंगेश पाडगांवकरांशी झालेली भेट-
स्पृहा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिने तिचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. ‘चांदणचुरा’ असं या तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाचं नाव. या कविता संग्रहात तिने ती १४ वर्षांची असल्यापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत केलेल्या कविता आहेत. पहिला कवितासंग्रह म्हणून हा तिच्यासाठी खास होताच, पण याबरोबरच या कवितासंग्रहाची प्रस्तावना लेखक, कवी प्रवीण दवणे यांनी लिहिली होती, तर याबरोबरच कविवर्य मंगेश पाडगांवकरांनीही या कवितासंग्रहसाठी तिला शुभाशीर्वाद दिले. या कवितासंग्रहाच्या निमित्ताने तिची मंगेश पाडगांवकरांशी पहिल्यांदा भेट झाली. या पुस्तकाच्या संदर्भात बोलण्यासाठी स्पृहा तिच्या आईबरोबर मंगेश पाडगांवकरांच्या घरी गेली होती. पहिल्यांदाच त्यांना भेटत असल्याने स्पृहाला खूप दडपण आलं होतं. ते आपल्याशी काय बोलतील? त्यांना आपल्या कविता आवडतील का? असे अनेक प्रश्न त्यावेळी स्पृहाच्या मनात होते. पण पाडगांवर येताच त्यांनी त्यांच्या गोड बोलण्याने स्पृहाचं दडपण घालवून टाकलं, असं स्पृहाने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

‘अशी’ गवसली लोपामुद्रा-
दरम्यानच्या काळात स्पृहाची एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा मालिकांमधून काम करत ती सर्वांच्या घराघरांत पोहोचली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत असतानाच तिच्यातलं हे काव्यही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत गेलं. अभिनेत्री म्हणून कौतुक होत असतानाच कवयित्री म्हणूनही सर्वजण तिचं कौतुक करू लागले. विविध मुलाखतींमधून, कार्यक्रमांमधून ती तिच्या कविता सर्वांना ऐकवायची. अशातच २०१६ मध्ये तिने तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित केला ज्याचं नाव ‘लोपामुद्रा’. या कवितासंग्रहात दुसऱ्यांसाठी झटताना ज्या स्त्रियांची मुद्रा लोप पावलेली आहे त्यांचं चित्रण तिने तिच्या कवितांमधून केलं आहे. यात स्त्रियांच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या कविता आहेत. या तिच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला अनेक मानवंत कलाकारांनी, कवींनी हजेरी लावली. या तिच्या कवितासंग्रहाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की त्याच्या प्रती दोन वेळा छापाव्या लागल्या. इतकंच नाही तर या कवितासंग्रहाची दुसरीही आवृत्ती काही महिन्यांत प्रकाशित झाली.

स्पृहा आणि तिचा यूट्यूब चॅनल-
२०११ मध्ये स्पृहाने तिचा ‘स्पृहा जोशी’ हा यूट्यूब चॅनल सुरू केला. सुरुवातीला ती त्यावर फारशी सक्रिय नव्हती. पण २०१७-१०१८पासून ती त्यावर सक्रियपणे तिच्या कविता चाहत्यांना ऐकवू लागली. फक्त तिच्याच नाही तर इतर कवींच्या कविताही ती या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना ऐकवू लागली. एखादी कविता तिच्या तोंडून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते आणि ते ऐकण्यासाठी चाहते तिला यूट्यूबवरही फॉलो करू लागले. या तिच्या उत्स्फूर्तवणामुळे काही महिन्यांपूर्वीच तिच्या या चॅनलने 100K सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला.

कवयित्री ते अभिनेत्री व्हाया गीतकार –
स्पृहाने आतापर्यंत अनेक कवींबरोबर स्टेज शेअर करत कवितांचे कार्यक्रम केले आहेत. यात वैभव जोशी, संदीप खरे, किशोर कदम, संकर्षण कऱ्हाडे, आदित्य दवणे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक यांसारखे अनेक लोकप्रिय कवी आहेत. सध्या सुरु असलेल्या तिच्या ‘नवंकोरं’ आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. फक्त कविताच नाही तर आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांसाठी गीतलेखनही केलं आहे. त्यापैकी ‘डबल सीट’ चित्रपटातील ‘किती सांगायचंय मला…’ हे गाणं आजही लोक गुणगुणतात, तर सुपरहिट ‘मुंबई पुणे मुंबई २’मधील ‘साद ही प्रीतीची…’ हे गाणंही तिनेच लिहिलं आहे हे फार कमी जणांना माहितेय.

स्पृहाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आतापर्यंत तिने ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘लोकमान्य’ अशा मालिका, ‘नांदी’, ‘समुद्र’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, यांसारखी दर्जेदार नाटकं, तसंच ‘बायोस्कोप’, ‘मोरया’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘लॉस्ट अँड फाउंड’ यांसारखे चित्रपट आणि ‘क्लास ऑफ 83’, ‘रंगबाझ फिर से’ यांसारख्या वेबसिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलंच, पण याबरोबरच अनेक पुरस्कार सोहळे आणि ‘सूर नवा घ्यास नवा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. अँकरिंगचा एक नवीन बेंचमार्क तिने सेट केला आहे असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. एक चतुरस्त्र अभिनेत्री, उत्कृष्ट आणि अभ्यासू सूत्रसंचालिका, संवेदनशील कवियित्री, गीतकार, अतिशय नम्र आणि दिलखुलास व्यक्ती आणि कायकाय लिहायचं तिच्याबद्दल!! तिच्या या प्रभावामुळे अनेक तरुणांना साहित्याची गोडी लागली, तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकजण लिहिते झाले, कवितांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन अनेकांना मिळाला. इतके गुण स्वतःमध्ये असतानाही सतत नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा ध्यास घेत राहणाऱ्या या अभिनेत्रीला, कवयित्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्पृहा, तुझ्याच शब्दांमध्ये तुला काही सांगायचं झालं तर –
“कितीतरी तारे, जे अजून पाहायचेत
कितीतरी दिवे, जे अजून जाणवायचेत
कितीतरी सूर्योदय, जे अजून उगवायचेत
कितीतरी दिवस, जे अजून जगायचेत
कितीतरी स्वप्नं, जी राहिलीत अजून पहायची
कितीतरी फुलं, जी राहिलीत अजून फुलायची
कितीतरी रात्री, अजून राहिल्यायत सजायच्या
‘कितीतरी ‘तू’ तुला अजून राहिल्यायत भेटायच्या!”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about spruha joshi poetic journey on her birthday rnv
Show comments