प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने एका क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक केली. यानंतर आता या प्रकरणाची माहिती देताना एनसीबीने न्यायालयात या प्रकरणात शेरलॉक होम्सच्या कथेप्रमाणे वळणं येत आहेत, अशी माहिती दिली. एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणी १६ जणांना अटक केलीय. यात शाहरुखच्या २३ वर्षीय मुलाचा म्हणजेच आर्यन खानचाही समावेश आहे.
मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश आर. एम. नेरळीकर यांनी आर्यन खानसह अब्दुल शेख (३०), श्रेयस नायर (२३), मनिष राजगरिया आणि अविन साहू यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. आरोपींच्या कोठडीची मागणी करताना विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी हे प्रकरण रहस्यमय कथांमधील पात्र असलेल्या शेरलॉक होम्सच्या कथांप्रमाणे झालंय. यात अनेक वळणं येत आहेत.
एनसीबी अधिकाऱ्यानेच आर्यन खानसोबत फोटो काढल्याचा दावा, व्हायरल फोटोमागील सत्य काय?
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या मूळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे असं मत नोंदवत न्यायाधीश आर. एम. नेरळीकर यांनी आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली.
नेमकं प्रकरण काय?
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.
आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती. माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.