बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि करीना कपूर सध्या त्यांच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याआधी करिनाने तिचे काही फोटो शेअर करून ती लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ या चॅट शोमध्ये दिसणार असल्याचे संकेत दिले होते, मात्र आता आमिर खान आणि करीना कपूरचे सेटवरील फोटोही लीक झाले असून सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत.

‘कॉफी विथ करण ७’ मध्ये करीना कपूर आणि आमिर खान खास पाहुणे म्हणून दिसणार असल्याचे बोललं जात आहे. दोघेही चॅट शोच्या ट्रेलरमध्ये दिसले नव्हते. पण आता सेटवरील फोटो पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. यापूर्वी करीना कपूर खानने तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ‘मला माझी ब्लॅक कॉफी आवडते’, असं लिहून तिने या शोमध्ये दिसणार असल्याचा इशारा दिला होता.

आणखी वाचा- करीना म्हणाली, ‘मला ब्लॅक कॉफी आवडते…’ तुम्हाला माहितीये का याचा अर्थ?

‘कॉफी विथ करण’च्या सेटवरून व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये शूटिंग सुरू होण्यापूर्वी आमिर खान सिगार पेटवताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये त्याच्या शेजारी करीना कपूर बसली आहे. ती करण जोहरशी बोलताना दिसत आहे. करणचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी जवळच्या टेबलावर ठेवलेला कॉफीचा मग दिसतोय, त्यावर ‘कॉफी विथ करण’ असं लिहिलं आहे.

आमिर आणि करिनाचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. यात मोना सिंग, नागा चैतन्यसह अनेक कलाकार आहेत. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हा अधिकृत रिमेक आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे.

Story img Loader