सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये नुकतीच सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या लोकप्रिय भावा बहिणीच्या जोडीने या एपिसोडमध्ये धम्माल केली आणि एकमेकांबद्दल तसेच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराबद्दलही बोलला. मलायकासोबतचं नातं सुरुवातीला सर्वांपासून लपवून ठेवण्याबाबत अर्जुनने मोठा खुलासा केला.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी अनेक अफवांनंतर २०१९ मध्ये त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. करण जोहरच्या चॅट शोमध्ये अर्जुन कपूरने म्हणाला, “मलायकाचा मुलगा अहरान खान अवघ्या १९ वर्षांचा आहे, त्याचा विचार आम्ही आमच्या नात्याबद्दल कुटुंब आणि लोकांना सांगितलं. मला असं वाटतं की मी वेगळं आयुष्य जगलोय. मी अशा परिस्थितीत वाढलो जिथे मुलगा म्हणून जगणं सोपी गोष्ट नव्हती. आजूबाजूला काय चाललं होतं याची जाणीव होती पण तरीही त्याचा आदर करायचा होता आणि स्वीकारही करायचा होता. त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांना विश्वासात घेऊन नंतर या नात्याबद्दल सांगावं ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी होती.
आणखी वाचा- अर्जुन कपूरच्या फोनमध्ये ‘या’ नावाने सेव्ह आहे गर्लफ्रेंड मलायकाचा नंबर
अर्जुन पुढे म्हणाला, “मलायकासोबत राहणं ही माझी निवड आहे पण प्रत्येकजण ते सहज समजून घेईल आणि स्वीकारेल अशी मी अपेक्षा करू शकत नाही. या नात्याला पुढे जाण्यासाठी परवानगी लागेल. मला नातेसंबंध आणि माझ्या जवळच्या माणसांचा आदर करायचा होता, प्रत्येकाला त्यात सामावून घ्यायचं होतं. आम्ही जोडीदार म्हणून याबद्दल बोललो नाही असं नाही. पण त्यावेळी तुमच्यात समजूतदारपणा असणं गरजेचं होतं. कारण ती एका मुलाची आई आहे. तिचं एक वेगळं जग होतं. वेगळं जीवन होतं. तिचा मुलगा तिच्यासोबत सुरुवातीपासून होता आणि मी तिच्या आयुष्यात नंतर आलो होतो. हा सगळा विचार करून आम्ही सुरुवातील सर्व गोष्टी आमच्यापर्यंतच मर्यादित ठेवल्या होत्या.”
आणखी वाचा- Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य
दरम्यान याबद्दल बोलताना सोनम कपूर म्हणाली, “मलायकासोबतच्या अर्जुनच्या नात्याबद्दल मलाही कल्पना नव्हती. पण आता मला वाटतं की ते चांगलं होतं कारण आता कोणी मला याबद्दल प्रश्न विचारल्यावर मला अस्वस्थ वाटत नाही.” अर्जुनने याच चॅट शोमध्ये लवकर लग्न करण्याचा त्याचा कोणताही विचार नसल्याचं आणि सध्या फक्त करिअरवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचंही स्पष्ट केलं.