‘कॉफी विथ करण ७’ या शोच्या नव्या भागामध्ये वरुण धवन व अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शक करण जोहरने दोघांनाही खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. रिलेशनशिप, वैवाहिक जीवन, ब्रेकअप अशा अनेक गोष्टींबाबत या कलाकारांनी या भागामध्ये खुलासा केला. इतकंच नव्हे तर एकंदरीत बी-टाऊनबाबतही या तिघांमध्ये अनेक गप्पा रंगल्या. पण यावेळी या शोमध्ये हजेरी लावणाऱ्या कलाकारांबरोबरच करणनेच आपल्या रिलेशनशिपबाबत खुलेपणाने बोलणं पसंत केलं आहे.
आणखी वाचा – Video : जाहिरातीमधील ‘ती’ तीन सेकंद अन् रातोरात प्रसिद्ध झाली होती ऐश्वर्या राय, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
चित्रपट, घराणेशाही सारख्या बऱ्याच मुद्द्यांमुळे करण नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्य नेहमीच अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरलं. आता अखेरीस तो आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलला आहे. त्याचं झालं असं की करण ‘कॉफी विथ करण ७’च्या नव्या भागामध्ये वरुणला प्रश्न विचारत होता. यावेळी वरुणनेच त्याला गोंधळात पाडलं आणि करणने आपल्या रिलेशनशिपबाबत सगळ्यांना सांगितलं.
तू रिलेशनशिपमध्ये कोणाला चीट केलं आहेस का? किंवा तुझी कोणी फसवणूक केली आहे का? असं वरुण करणला विचारतो. यावेळी तो म्हणतो, “मी रिलेशनशिपमध्ये कधीच कोणाची फसवणूक केली नाही.” यावर वरुण लगेचच म्हणतो, “याचाच अर्थ तू रिलेशनशिपमध्ये आहेस.” वरुणला पुन्हा करण अगदी सडेतोड उत्तर देतो.
आणखी वाचा – “अजूनही खूप लोकांना माहीत नाही की…” पंकज त्रिपाठींनी सिद्धार्थ शुक्लाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत
“तुला माहीत आहे सध्या मी रिलेशनशिपमध्ये नाही. तुला हेसुद्धा माहित आहे की मी ब्रेकअप केलं आहे.” असं करण म्हणतो. ब्रेकअपदरम्यान वरुणने आपल्याला पाठिंबा दिला असल्याचंही करणने यावेळी सांगितलं. तसेच वरुणचे त्याचे आभार देखील मानले. करणचं ब्रेकअप झालं पण आपण कोणाबरोबर नात्यात होतो हे करणने सांगणं अगदी कटाक्षाने टाळलं.