‘कॉफी विथ करण ७’च्या नव्या भागाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. या शोच्या नव्या भागामध्ये किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे तसेच संजय कपूरची पत्नी महीप कपूर हजेरी लावणार आहे. यावेळी भावना, महीपसह गौरी तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे करणार आहे. शिवाय दिग्दर्शक आणि शोचा सुत्रसंचालक करण जोहरने तिला तिच्या कामाबाबतही काही प्रश्न विचारले. यावेळी आपल्याला बऱ्याचदा काम मिळत नसल्याचं गौरीने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं.
काय म्हणाली गौरी खान?
शाहरुख खानची पत्नी म्हणून गौरी नेहमीच चर्चेत असते. गौरी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे. सुपरस्टारची पत्नी असूनही आपली आवड जोपासण्यासाठी आजही ती काम करते. पण आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाता आलं नसल्याची गौरीला खंत आहे. शाहरुख खानची पत्नी म्हणूनच तिच्याकडे लोक पाहतात हे तिला बऱ्याचदा खटकतं. शिवाय यामुळे तिला काम देखील मिळत नसल्याचं गौरीचं म्हणणं आहे.
गौरी म्हणते, “जेव्हा कामासाठी मी एखाद्या व्यक्तीला भेटते तेव्हा काही लोकच इंटिरियर डिझायनर म्हणून माझ्याकडे पाहतात. बऱ्याचदा असं होतं की माझ्याकडे कामच नसतं. कारण मी शाहरुख खानची पत्नी आहे. मी शाहरुख खानची पत्नी आहे म्हणून लोक मला काम देत नाहीत.” गौरीला तिच्या क्षेत्रामध्ये खूप काम करायचं आहे.
एका सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी असल्याचे काही तोटे देखील आहेत असं गौरी खानचं म्हणणं आहे. गौरीने आपल्या घराचं इटिंरियर देखील स्वतःच केलं आहे. शिवाय तिला आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची इच्छा आहे. अजूनही ती त्यासाठी खूप मेहनत घेते. तसेच प्रत्येक काम मिळवण्यासाठी धडपड करत असते. हे तिच्या बोलण्यामधूनही स्पष्ट होतं.