चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा प्रसिध्द टॉक शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे हे सहावं पर्व असून, नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भटने पहिल्या भागात हजेरी लावली. या दोन्ही अभिनेत्रींच्या उपस्थितीत रंगलेल्या या भागामध्ये लग्नानंतर रणवीर सिंग पतीची भूमिका कशी पार पाडेल याविषयी दीपिकाने खुलासा केला आहे.

बॉलिवूडमधील मोस्ट हापनिंग कपल म्हणून ओळखली जाणारी दीपिका -रणवीर ही जोडी येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. याविषयीची माहिती खुद्द दिपीका आणि रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून दिली. सध्या बॉलिवूडमध्ये या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली असतानाच करणनेही त्याच्या शोमध्ये दीपिकाला याविषयी बोलत केल्याचं पाहायला मिळालं.

कॉफी विथ करणच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये दीपिकाला रणवीरविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना, ‘रणवीर लग्नानंतर सुद्धा मम्माज बॉय राहणार असल्याचं  दीपिका म्हणाली. ‘रणवीरला प्रत्येक गोष्टीत आईचा सल्ला किंवा साथ हवी असते. त्यामुळे तो लग्नानंतर सुद्धा मम्माज बॉय म्हणूनच राहिलं असं ती म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘रणवीर उत्तमरित्या त्याच्या भावना व्यक्त करतो. आनंद असो किंवा दु:ख तो स्पष्टपणे त्याच्या भावना व्यक्त करत असतो, त्यामुळे मला त्याचा हा स्वभाव प्रचंड आवडतो.फक्त त्याचा आळशी स्वभाव मला आवडत नाही. मात्र लग्नानंतर सुद्धा त्याच्या स्वभावात फार काही फरक पडेल असं दिसून येत नाही’.

दरम्यान, संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिपीका आणि रणवीर एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या जोडीची चर्चा रंगली होती. अखेर या जोडीने त्यांचं नातं सर्वमान्य केल्यानंतर आता लवकरच ही जोडी लग्न करणार आहे.

Story img Loader