या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुहास भोसले यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राज्य शासनाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या १० मराठी चित्रपटांमध्ये नाशिकचे सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ या चित्रपटाचा समावेश असून आतापर्यंत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झालेल्या ‘कोती’च्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोवल्याचे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट दाखविल्यास आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांच्या नजरेस ते येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे विपणन होण्यास मदत होऊ शकते हे हेरून या महोत्सवासाठी मराठी चित्रपट पाठविण्यात येत आहेत. गोव्यातील आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी २७ चित्रपटांच्या परीक्षणानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १० चित्रपट निवडले. त्यात कटय़ार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये कोती या चित्रपटाचाही समावेश आहे. तृतीयपंथीयांच्या बालपणावर आधारित हा चित्रपट असून आजपर्यंत विविध महोत्सवांमध्ये परीक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. मागील वर्षी गोव्यातच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातील स्पर्धेसाठीही या चित्रपटाची निवड झाली होती.

कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागासाठी मराठी भाषेतील केवळ कोती या एकमेव चित्रपटाची निवड झाली होती. याशिवाय या महोत्सवातील ‘फिल्म बझार’ या विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय हे तीन मराठी चित्रपट राज्य शासनाच्या वतीने पाठविण्यात आले होते.

कोती चित्रपटाने याशिवाय दिल्लीतील एज्युकेशनल एक्स्पो टीव्हीच्या वतीने आयोजित महोत्सवात परीक्षकांच्या पसंतीचे दादासाहेब फाळके पारितोषिक, कोल्हापूरमधील संस्कृती कलादर्पण संस्थेच्या वतीने आयोजित मायमराठी महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकाविले आहे. सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचे डिसेंबरमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे.

या चित्रपटाचे अभिनेते व कवी सौमित्र, सुहास पळशीकर यांसारख्या अनेक ज्येष्ठांनी कौतुक केले आहे. वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी हे भोसले यांचे वैशिष्टय़े मानले जात असून अलीकडेच वाळूमाफिया व राजकारण हा विषय त्यांनी ‘रेती’ या चित्रपटाव्दारे मांडला होता. टीव्ही जगतातील विविध मालिकांमध्ये नाशिकचे अनेक चेहरे दिसू लागले आहेत. नाशिकचे नाव अभिनयाच्या क्षेत्रात युवा पिढी झळकवत असताना चित्रपट दिग्दर्शनात सुहास भोसले हे नाव प्रकर्षांने पुढे आले आहे.