अभिनेत्री क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्षं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या कामाबरोबरच क्रांती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असते. क्रांतीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : “२५ हजार कोटींचा धनादेश अन्…” ‘द केरला स्टोरी’नंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा
क्रांती रेडकरला छबील आणि गोदू अशा दोन मुली आहेत. अभिनेत्रीने या दोघींचा एकही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला नाही, परंतु त्यांचे चेहरे न दाखवता त्यांनी गायलेली गाणी-गप्पांच्या पोस्ट अभिनेत्री शेअर करते. अशाच एका व्हिडीओमध्ये छबीलच्या रडण्याचा आवाज येत आहे. यावर क्रांती म्हणते, “आम्ही आज लहान मुलांचा फ्रोझन हा चित्रपट पाहिला. त्यात एल्सा आणि अनियाचे आई-वडील देवाघरी जातात. हे पाहून छबीलने रडून-रडून गोंधळ घातला आहे.”
हेही वाचा : “अभिनेता हा घर बांधणाऱ्या गवंड्यासारखा…” वैभव मांगले यांचे स्पष्ट मत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…
क्रांती छबीलला नक्की काय झालंय तुला असे विचारते तेव्हा तिची मुलगी म्हणते, “एल्सा आणि अनियाचे मम्मा-पप्पा त्यांना सोडून गेले” यावर क्रांती बोलते, “तू का रडतेस? तुझे आई-वडील इथेच आहेत ना?” परंतु तिची मुलगी कोणाचे काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती, तिला चित्रपटातील प्रसंग पाहून फारचं दु:ख झाले आहे असे क्रांतीने सांगितले.
याउलट क्रांतीची दुसरी लेक गोदू हिला या सगळ्याचा काहीच फरक न पडला नाही. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “छबील रडतेय पण, दुसरीकडे गोदू मला ज्यूस दे सांगतेय…हे सगळे असे आहे आता काय करायचे?” दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत, तर काहींनी “मुलींचा चेहरा एकदा तरी दाखव” अशी मागणी केली आहे.